दावोस- शिवसेना 2019 च्या विधानसभा, लोकसभा निवडणूका स्वबळावर लढेल अशी घोषणा शिवसेनेने मंगळवारी केली. शिवसेनेच्या या घोषणेची दखल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी दावोसमध्ये असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. त्यांनी (शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे) अनेक गोष्टी बोलत आहे. पण सध्या तरी आमची युती आहे, आणि हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. दावोसमध्ये माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा ठराव एकमताने झाला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपल्या भाषणात यापुढे शिवसेना देशातील सर्व निवडणुका लढवणार असल्याचं जाहीर केलं. त्यांनी आपल्या भाषणात अनेक गोष्टी बोललेल्या आहेत. वाट पाहूयात.. सध्या तरी मी यावर जास्त बोलणार नाही. पण आमचं युतीचं सरकार सध्या आहे, आणि हे सरकार पाच वर्षांचा आपला कालावधीही पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आज केलेल्या भाषणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर सडकून टीकाही केली. श्रीनगरमध्ये रोड शो केला असता, तिथे पतंग उडवली असती तर आम्हालाही अभिमान वाटला असता. जगभरातील पंतप्रधानांसोबत अहमदाबादेत पतंग उडवण्यापेक्षा लाल चौकात नेऊन तिरंगा फडकवा असा टोला त्यांनी लगावला.
हिंदू मतांमध्ये फाटाफूट नको म्हणून आतापर्यंत महाराष्ट्राबाहेर निवडणूक लढलो नाही. आता नको ती लोक हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन डोक्यावर येऊन बसलेत. यापुढे प्रत्येक राज्यात शिवसेना निवडणूक लढणार. जिंकलो, हारलो तरी हिंदुत्वाला अंतर देणार नाही अशी घोषणाच उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. गाईला मारणे पाप आहे त्याप्रमाणे थाप मारणेही पाप आहे. थापाबंदी करा. लोकांना भुलवून सत्ता मिळवणं पाप आहे असा टोला उद्दव ठाकरेंनी भाजपाला लगावला.