बाहुबली : भारतीय जैन संघटना जैन समाजाच्या प्रगतीसोबतच राष्ट्र उभारणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेत असल्याची घोषणा भारतीय जैन संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी रविवारी येथे केली.कुंभोजगिरी-बाहुबली (ता. हातकणंगले) येथे भारतीय जैन संघटनेच्या राज्य अधिवेशनामध्ये शांतीलाल मुथ्था बोलत होते. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख व राज्याध्यक्ष पारस ओसवाल, सेक्रेटरी अभिनंदन खोत, शाहू महाराज, संजय घोडावत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुथा म्हणाले, ३0 वर्षांपासून जैन संघटना समाजसेवेचे कार्य करीत आहे. देशातील विविध नैसर्गिक आपत्तीत जसे तमिळनाडू, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, गुजरात व नेपाळ या ठिकाणी संघटनेने नागरी सुविधा पुरविल्या होत्या. यावर्षी महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुंटुबाचे सर्वेक्षण करून त्यावर उपाय शोधण्याचे काम सुरू आहे. बीड जिल्ह्यातील ११७ तलावांमधील गाळ काढून हजारो शेतकऱ्यांना २0 लाख क्युबिक सें. मी. इतके पाणी उपलब्ध करून दिले आहे. समाजसेवेची कामे अशीच सुरू ठेवणार आहे. संजय घोडावत यांनी संघटनेच्या कार्याला आवश्यक ती सर्व मदत करण्याचे तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसोबत त्यांच्या मुलांना घोडावत इन्स्टिट्यूटकडून स्क ॉलरशिप देण्याचे आश्वासनही दिले.शाहू महाराज म्हणाले, भारतीय जैन संघटनेचे कार्य आश्चर्यचकित करणारे आहे. ही मानवतावादी संघटना आहे. याचे अनुकरण अन्य सामाजिक संघटनांनी करावे. संघटनेने शासनालादेखील आपल्या कार्यातून दिशा दाखवावी.संघटनेचे जे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांनी आगामी काळातील संघटनेच्या कार्याबाबत कार्यकर्त्यांना प्रबोधन केले. ते म्हणाले, जैन समाज एकूण लोकसंख्येच्या अर्धा टक्केदेखील नाही; परंतु देशाच्या विकासात त्याचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांनी ‘स्टुडंट एज्युकेशनल टूर’ ही संकल्पना राज्यभर राबविणार असल्याचे सांगितले. संघटनेचे राज्य सेक्रेटरी अभिनंदन खोत यांनी पश्चिम महाराष्ट्रातील जैन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. जैन समाजातील गरीब व रोजंदारीवर जाणाऱ्या बांधवांविषयीची कणव त्यांनी व्यक्त केली. जैन समाजातील आर्थिक दरी संपविण्याचे त्यांनी आवाहन केले.संघटनेचे राज्य अध्यक्ष पारस ओसवाल यांनी जैन समाजाने शिक्षणासह व्यापार व व्यवसायावर लक्ष द्यावे, असे आवाहन केले. त्यांनी युवक-युवतींसाठी शिक्षणविषयक प्रबोधन, आदी कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी अनिल पाटील यांनी संपादित केलेल्या संघटनेच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.कार्यक्रमास संघटनेचे राष्ट्रीय सेक्रेटरी महेश कोठारी, पंजाबचे अध्यक्ष राकेश जैन, गुजरातचे अध्यक्ष मालतीबेन मेहता, तमिळनाडूचे उपाध्यक्ष कैलासमलजी दुगड, हस्तिमल बंब, अशोक संघवी, सुदर्शन जैन, सुरेश मगदूम, डॉ. शीतल पाटील, विक्रांत नाईक, सुरेश पाटील (सांगली), बी. टी. बेडगे, बाबासाहेब पाटील, डी. सी. पाटील, स्वरूपा यड्रावकर, कुं भोजगिरी तीर्थ कमिटीचे प्रमुख अंबालालजी जैन, मनिकांत शहा, रावसाहेब भिलवडे, यांच्यासह देशभरातून विविध प्रांतांतून पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)३५0 मुलांची जबाबदारी राज्यातील मराठवाडा व विदर्भातील ३५0 मुलांच्या पाचवी ते १२ वीच्या शिक्षणाची जबाबदारी संघटनेने उचलली आहे. संघटना वाघोली (पुणे) येथील वसतिगृहात विद्यार्थ्यांना सांभाळण्याचे काम करते आहे. त्याची दखल राज्यपालांनी घेतली आहे.अमर गांधी नवे राज्याध्यक्षया अधिवेशनात २०१६ ते नोव्हेंबर २०१८साठी चंद्रपूर येथील अमर गांधी यांची राज्याध्यक्ष म्हणून घोषणा झाली. ते आठ वर्षे राज्य कार्यकारिणीचे सदस्य आहेत.
त्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार
By admin | Published: January 11, 2016 1:12 AM