अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्र सरकारने लॉकडाउनबद्दल निर्णय जाहीर करताच राज्य सरकारही निर्णय जाहीर करेल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले. जरी केंद्र सरकारने लॉकडाउन वाढवला तरी महाराष्ट्रात ज्या भागात लॉकडाउनची गरज नाही ते भाग सुरू करण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्याचेही परब यांनी लोकमत यू ट्युबला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.
जे भाग कंटेनमेंट एरिया म्हणून जाहीर केले आहेत ते बंद ठेवायचे आणि बाकीचे विभाग सुरू करायचे याविषयीची तयारी सुरू आहे. मुंबईत शहर बस वाहतूक सेवा आणि लोकल रेल्वे सेवा कोणासाठी सुरू करता येईल? जेणेकरून एकाच वेळी या दोन्ही यंत्रणांवर ताण येणार नाही, यासाठीचे काम सुरू आहे. एकाच वेळी सगळ््यांना मोकळीक दिली तर परिस्थिती गंभीर होईल, ती होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही परब म्हणाले. महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिकांना अनेक आकर्षक सवलती देण्याची योजना राज्य सरकारने आखली होती. ते काम अंतिम टप्प्यात असतानाच कोरोनाचे संकट आले, त्यामुळे हा विषय मागे पडला.
आता सरकारने पुन्हा सगळे लक्ष तिकडे केंद्रित केल्याची माहितीही परब यांनी दिली. महाराष्ट्रातून १५ लाख लोक परराज्यात गेले आहेत. रोजगाराच्या प्रचंड संधी महाराष्ट्रात जन्म झालेल्या तरुणांना उपलब्ध झाल्या आहेत. फक्त त्या संधी घेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. सरकारच्यावतीने कोणत्या क्षेत्रात किती रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील याची माहिती लवकरच दिली जाईल. मुंबई सुरू करण्याकडे आमचे सगळे लक्ष आहे, असेही ते म्हणाले.