ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२- इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचे सामने महाराष्ट्राबाहेर नेण्याच्या विचार करण्याचा सल्ला न्यायालयानं बीसीसीआयला दिला आहे. आयपीएलला वापरण्यात येणा-या पाण्यापैकी काही पाणी दुष्काळग्रस्त भागाला देण्याचा विचार आहे की नाही, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालायानं बीसीसीआयला केली आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आयपीएलचे सामने व्हावे की नाही यावर वाद सुरू असतानाच मुंबई उच्च न्यायालयानं त्यात उडी घेतली आहे. महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीलाही मदत करण्याचा विचार करावा, असाही सल्ला यावेळी न्यायालयानं दिला आहे. एका सामन्यासाठी किती पाणी वापरात येते, याची माहिती देण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत.
वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या आयपीएल सामन्यांसाठी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब अर्थात महालक्ष्मी रेसकोर्सवरून पाणी आणू, अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनं न्यायालयात दिली आहे. याप्रकरणी आजची सुनावणी स्थगिती केली आहे. आता उद्या पुन्हा या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.