काँग्रेसची तिसरी यादी: महाराष्ट्राचे ७ उमेदवार जाहीर; सोलापुरातून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 07:23 AM2024-03-22T07:23:49+5:302024-03-22T07:26:49+5:30
कोल्हापुरातून शाहू छत्रपती, पुण्यातून लढणार रवींद्र धंगेकर
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर केली असून त्यात सात राज्यांतील ५७ जागांचा समावेश आहे. यादीमध्ये महाराष्ट्रातील ७ लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील हे सातही उमेदवार काँग्रेसच्या यादीत असतील असे ‘लोकमत’ने गुरुवारीच प्रसिद्ध केले होते.
यादीत कर्नाटक १७, गुजरात ११, प. बंगाल ९, राजस्थान ६, तेलंगणा ५, अरूणाचल प्रदेशमधील २ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. राजस्थानमधील सीकर ही जागा सीपीआयएमसाठी सोडली असून, ५६ जागांसाठी काँग्रेसने उमेदवार दिले आहेत. अधीर रंजन चौधरी बेहरामपूर येथून तर मल्लिकार्जुन खरगे यांचे जावई राधाकृष्ण गुलबर्गामधून मैदानात उतरणार आहेत.
पटोले, वडेट्टीवार यांचे नाव नाही!
भंडारा-गोंदिया मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, चंद्रपूरमध्ये विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची नावे निश्चित झाल्याचे मानले जात असतानाच काँग्रेसच्या गुरुवारी जाहीर झालेल्या यादीत मात्र या दोघांचीही नावे नाहीत.
सांगली ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेल्याचे चित्र
सांगली मतदारसंघ काँग्रेसकडेच राहणार असे काँग्रेसचे नेते सांगत आहेत. मात्र, त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तेथून शिवसेनेचे उमेदवार म्हणून पैलवान चंद्रहार पाटील यांचे नाव जाहीर केले. त्यातच आजच्या काँग्रेसच्या यादीत विशाल पाटील यांचे सांगलीसाठी नाव जाहीर झालेले नाही. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला असल्याचे चित्र आहे.
गडकरींविरोधात कोण? नाव अद्याप जाहीर नाही!
नागपूर पश्चिमचे आमदार, माजी महापौर विकास ठाकरे यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध मैदानात उतरविण्यात येणार हे जवळपास निश्चित मानले जात असले तरी काँग्रेसच्या आजच्या यादीत नागपूरचा समावेश नाही. तसेच बाजूच्या रामटेक मतदारसंघातील उमेदवारदेखील जाहीर करण्यात आला नाही.