पाकिस्तानचे उच्चायुक्त : नागपूरकरांच्या प्रश्नांना थेट उत्तरेनागपूर : अनेकदा असे म्हटले जाते की भारत आणि पाकिस्तानदरम्यान कुठली तरी तिसरी शक्ती आहे. परंतु अशी कुठलीही शक्ती अस्तित्वात नाही. पाकिस्तानच्या सेनेबाबतदेखील अनेक गैरसमज आहे. परवेझ मुशर्रफ राष्ट्राध्यक्ष असताना दोन्ही देशांमध्ये शांततेसाठी बरेच प्रयत्न झाले होते ही बाब लक्षात घ्यायला हवी, असे मत पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी व्यक्त केले. लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘लोकमत नॉलेज फोरम’ अंतर्गत आयोजित ‘इंडिया अॅण्ड पाकिस्तान : अ डायलॉग विदाऊट बॉर्डर्स’ या विशेष चर्चासत्रातील प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान ते बोलत होते. ‘सार्क’ परिषदेकडून अपेक्षा : दक्षिण आशियातील देशांच्या विकासासाठी ‘सार्क’ हा अतिशय चांगला मंच आहे. भारत व पाकिस्तान यांच्यातील ताणलेल्या संबंधांमुळे याचा हवा तसा उपयोग होऊ शकला नाही. परंतु या वर्षी इस्लामाबाद येथे होणाऱ्या ‘सार्क’ देशांच्या बैठकीत सकारात्मक निर्णयांची अपेक्षा आहे, असे अब्दुल बासित म्हणाले. - जम्मू-काश्मीरचा मुद्दा हा केवळ जागेचा मुद्दा नाही, तर तो लोकांच्या भावनांशी जुळलेला मुद्दा आहे. त्यामुळे याला बाजूला ठेवून चर्चा शक्यच नाही, असे एका प्रश्नाच्या उत्तरात बासित म्हणाले. पाकिस्तान हा मुस्लीम देश आहे. परंतु याचा अर्थ ‘मॉडर्न’ होण्यास आमचा विरोध आहे असे नाही. देशात आम्ही अल्पसंख्यकांना सारखेच महत्त्व देतो, असे एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले. ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे ‘नॅशनल एडिटर’ हरीश गुप्ता यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. या वेळी नागपुरातील राजकीय, शिक्षण, प्रशासकीय, सामाजिक, औद्योगिक, वैद्यकीय, विधि यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
तिसरी शक्ती अस्तित्वात नाही
By admin | Published: June 05, 2016 1:13 AM