ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २९ - अहमदाबाद येथील युवकासोबत लग्न झालेल्या २0 वर्षीय विवाहितेने तिस-यांदा अकोल्यातील प्रियकरासोबत पलायन केले. विवाहितेचा शोध घेत, तिचे माहेरकडील कुटूंबिय गुरूवारी अकोल्यात पोहोचले. कुटूंबियांनी विवाहितेला ताब्यात घेऊन सायंकाळी रामदासपेठ पोलीस ठाणे गाठले. याठिकाणी प्रियकराचेही कुटूंब पोहोचल्या दोन्ही गटात चांगलाच वाद रंगला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. पोलिसांच्या डोळ्यांदेखतच दोन्ही कुटूंबातील महिला सदस्यांनी एकमेकांना मारहाण केली.
अहमदाबाद येथील युवतीचे अकोल्यातील एका युवकासोबत सुत जुळले. दरम्यान ही बाब तिच्या कुटूंबियांना कळल्यानंतर त्यांनी तिच्या इच्छेविरूद्ध अहमदाबाद येथील एका युवकासोबत लग्न झाले. लग्नाला दोन वर्ष झाल्यानंतरही प्रियकर व युवतीची एकमेकांना भेटायचे. पती आवडत नसल्याने आणि मनाविरूद्ध लग्न झाल्यामुळे युवतीने प्रियकरासोबत पलायन केले. कुटूंबियांनी युवतीला ताब्यात घेऊन अहमदाबादला आणले. काही दिवस उलटत नाही तो, दुसºयांदा युवतीने प्रियकरासोबत पलायन केले. महिनाभरानंतर कुटूंबियांनी युवतीला शोधून तिला घरी आणले. घरी आणून पंधरा दिवस होत नाही. तोच, पुन्हा युवतीने तिस-यांदा आपल्या प्रियकरासोबत पलायन केले आणि थेट अकोला गाठले. कुटूंबियांना ही बाब माहिती पडताच, त्यांनीही गुरूवारी दुपारी अकोला गाठले आणि प्रियकराच्या ताब्यातून तिला सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलीने प्रियकराच्या कुटूंबासमवेत रामदासपेठ पोलीस ठाणे गाठले आणि कुटूंबियांविरूद्ध तक्रार देण्याची तयारी केली. याठिकाणी युवतीचेही कुटूंबिय पोहोचले. कुटूंबातील सदस्य तिची समजूत घालत असताना, युवतीने कुटूंबियांनी माझ्या इच्छेविरूद्ध लग्न केले. मला मुलगा पसंत नाही. मी त्याच्याकडे जात नाही. प्रियकराकडे राहण्याचा निर्णय तिने पोलिसांना सांगितला. युवती हाताबाहेर जात असल्याचे कुटूंबियांनी तिला जबरदस्ती केली. यामध्ये प्रियकराच्या कुटूंबातील सदस्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, दोन्ही गटात शाब्दीक वाद सुरू झाला आणि पोलिसांच्या डोळ्यांदेखतच त्यांच्यामध्ये हाणामारी झाली. पोलिसांनी काही सदस्यांना ताब्यात चांगलाच चोप दिला. रात्री उशिरापर्यंत पोलीस दोन्ही कुटूंबांचे म्हणणे ऐकून घेत होते. दोन्ही कुटूंबियांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पोलीस निर्णय घेतील. (प्रतिनिधी)