‘काकां’वरच्या नाराजीचा तिसऱ्यांदा झाला स्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 02:39 AM2019-09-28T02:39:38+5:302019-09-28T06:49:52+5:30
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अजित पवारांनी तडकाफडकी दिलेला राजीनामा देखील ‘काकां’वरच्या नाराजीतून दिला गेला असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.
- सुकृत करंदीकर
पुणे : सन २००४, सन २००९, सन २०१९ यातल्या प्रत्येक वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यावर नाराज होण्याची वेळ ओढवली. ही वेळ दुसºया कोणामुळे नव्हे तर ‘राष्ट्रवादी’चे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामुळेच आली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अजित पवारांनी तडकाफडकी दिलेला राजीनामा देखील ‘काकां’वरच्या नाराजीतून दिला गेला असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.
काही महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून स्वत:च्या मुलाला पार्थला पक्षाची उमेदवारी मिळावी, यासाठी अजित पवारांना मिन्नतवाऱ्या कराव्या लागल्या होत्या. पंधरा वर्षे अनेक निवडणुकांची शेकडो तिकीटे वाटणाऱ्या अजित पवारांना ही गोष्ट फार लागली होती. ‘काका’ आपल्याला डावलतात, अशी भावना त्यांच्या मनात येण्याची ही पहिली वेळ नाही.
२००४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने ७१ तर काँग्रेसने ६९ जागा जिंकल्या होत्या. त्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार ठरवण्यापासून ते प्रचारयंत्रणा राबवण्यापर्यंत अजित पवारांनी मोठा पुढाकार घेतला होता. स्वाभाविकपणे पक्षात अजित पवारांना मानणाऱ्या आमदारांची संख्या अर्थातच जास्त होती.
काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकल्याने आपल्या रुपाने ‘राष्ट्रवादी’ने मुख्यमंत्रिपदावर दावा सांगावा, हा अजित पवार यांचा आग्रह होता. मात्र शरद पवारांनी तसे घडू दिले नाही. राज्यात आणि केंद्रात जास्तीची मंत्रीपदे घेऊन मुख्यमंत्रिपद काँग्रेसला देण्याचा निर्णय त्यांनी केला. काँग्रेस पूर्णत: ‘बॅकफूट’वर असतानाही हाती येणारे मुख्यमंत्रिपद निसटल्याने अजित पवार पहिल्यांदा काकांवर नाराज झाले होते.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्यावेळी अजित पवारांना काँग्रेसबरोबर आघाडी करण्यात रस नव्हता. भाजप-शिवसेना या पक्षातील आमदार फोडून राष्ट्रवादीचे सरकार आणण्याची महत्त्वाकांक्षी योजना त्यांनी आखली होती. त्यासाठी उद्धव ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या ते संपर्कात होते. सिमल्याला मुंडे-अजितदादांची भेट झाल्याची खमंग चर्चा त्यावेळी रंगली होती.