माणगाव : रांगणा तुळसुली येथे शनिवारी अर्ध्यावर सोडण्यात आलेल्या हत्ती पकड मोहिमेला रविवारी रात्री उशिरा पूर्णत्वास नेण्यात आले. नानेली कोल्ह्याचे पाणी या जंगल परिसरात या रानटी हत्तीला डॉट मारून पकडण्यात आले. तिन्ही हत्ती पकडले गेल्याने ही मोहीम यशस्वी झाली असून, जिल्हा हत्तींच्या त्रासापासून मुक्त झाला आहे.शनिवारी दिवसभर हत्तीने तीनवेळा वनविभागाला चकवा दिला. त्यामुळे शनिवारी हत्ती पकड मोहीम थांबवत रविवारी सकाळी सुरू करण्याचे ठरविण्यात आले. हत्तीला डॉट मारण्यासाठी झुडपांचा अडसर होत होता. दरम्यान, नानेली येथील संदीप मनोहर मोरये यांनी रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नानेलीच्या जंगलात टस्कर दिसल्याचे वनविभागाला कळविले. पथकाचा रांगणा-तुळसुली येथील मुक्कामाचा सुगावा या हत्तीला लागल्याने हा टस्कर रात्रीच्या रात्री निवजे जंगलामार्गे नानेलीच्या जंगलात गेला असावा, त्यामुळे रांगणा-तुळसुली येथे थांबलेल्या कर्नाटक येथील पथकाला पुन्हा माघारी आंबेरीकडे फिरावे लागले. सकाळी ११ च्या सुमारास चार हत्तींसह वनविभागाचे पथक पुन्हा आंबेरी नाक्याजवळील मुक्कामावर आले. या पथकाचे प्रमुख डॉ. उमाशंकर यांनीही आंबेरी येथे येत नानेलीच्या जंगलात हत्तीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. नानेलीतील जंगलात रानटी हत्ती असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दुपारी तीन वाजता आंबेरी नाका येथून चारही प्रशिक्षित हत्तींना ट्रकमध्ये भरून नानेली डोंगरानजीक आणण्यात आले. नानेली डोंगरानजीक गणेश मंदिराजवळ या प्रशिक्षित हत्तींना उतरवल्यानंतर या हत्तींनी गणेश मंदिरात जात गणेशाला वंदन केले. यानंतर नानेलीच्या जंगलात रानटी हत्तीला शोधण्यासाठी पथकासह प्रशिक्षित हत्ती रवाना झाले.सायंकाळी उशिरापर्यंत वनविभागाचे कर्नाटकवरून दाखल झालेले पथक नानेलीच्या जंगलात रानटी हत्तीचा शोध घेत होते. मात्र, रानटी हत्ती या पथकाला हुलकावणी देत जंगलात पुढे पुढे जात असल्याने त्याला पकडणे कठीण झाले आहे. मात्र, हत्ती जंगलात काही वेळ दर्शन देत असून, झाडाझुडपांच्या दाटीवाटीमुळे हत्तीवर डॉट मारणे शक्य होत नाही. त्यामुळे उशिरापर्यंत ही हत्ती पकड मोहीम सुरूच होती. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नानेली येथील रेमुळकर यांच्या घरानजिकच्या जंगलात रानटी हत्तीला डॉट मारला असल्याची चर्चा उपस्थितांत होती. मात्र, वनविभागाचे पाणी घेऊन जाणारे तसेच अन्य कर्मचारी उशिरापर्यंत नानेलीतच होते. त्यामुळे डॉट मारला की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. नागरिकांची गर्दी रविवारी रानटी हत्तीला पकडण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आल्यानंतर जिल्हाभरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सकाळी रांगणा तुळसुली परिसरातून प्रशिक्षित हत्तींसह पथक आंबेरीत दाखल झाले. त्याच्यासोबत हौशी नागरिकही रांगणा-तुळसुली परिसरातून त्यांच्या मागोमाग आंबेरी परिसरात आणि तेथून नानेलीच्या डोंगरानजिक गर्दी करून होते. (प्रतिनिधी)कोल्ह्याचे पाणी या भागात हत्ती जेरबंद दरम्यान, कर्नाटकहून आलेली टीम रानटी हत्तीच्या शोधार्थ रात्री उशिरापर्यंत नानेलीच्या जंगलात फिरत होती. यावेळी या रानटी हत्तीला कोल्ह्याचे पाणी या परिसरात डॉट मारण्यात आला. त्यानंतर तत्काळ वन कर्मचाऱ्यांना पाण्याचे कॅन घेऊन पाचारण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत हत्तीला आंबेरी येथे घेऊन येण्याची प्रक्रिया सुरू होती.
तिसरा रानटी हत्तीही जेरबंद
By admin | Published: February 15, 2015 11:02 PM