वसंत भोसले - कोल्हापूर
महाराष्ट्र विधानसभेच्या 77 वर्षाच्या इतिहासात आज तिस:यांदा राष्ट्रपती राजवट लागू होते आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्ष अल्पमतात येऊन राजकीय अस्थिरता निर्माण होऊन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची ही पहिल्यांदाच वेळ आली आहे. यापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात एकदा आणि 198क्मध्ये पुलोद सरकार बहुमतात असतानाही बरखास्त केल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
राज्यात गेली 15 वर्षे कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. बाराव्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आघाडीत जागावाटपावरून मतभेद झाले आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसने परवा (गुरुवारी) रात्री सरकारचा पाठिंबा काढून घेत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आघाडीचे सरकार अल्पमतात आले आहे. या सरकारला कॉँग्रेसच्या 82 आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या 62 आमदारांचा तसेच 13 अपक्ष आमदारांचे पाठबळ होते. जागावाटपावरून झालेल्या मतभेदांमुळे आघाडीचे सरकार अखेर अल्पमतात आले.
महाराष्ट्र विधानसभेचे हे 77वे वर्ष आहे. 19 जुलै 1937 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेसचे पहिले सरकार सत्तेत आले होते. त्या वेळी ‘मुंबई प्रांत विधानसभा’ असे म्हटले जात असे. 1939मध्ये सुरू झालेल्या दुस:या महायुद्धामध्ये भारताला ब्रिटिशांनी युद्धराष्ट्र म्हणून घोषित केले. त्याच्या निषेधार्थ खेर मंत्रिमंडळाने 3क् ऑक्टोबर 1939 रोजी राजीनामा दिला होता. त्यामुळे तत्कालीन राज्यपाल लॉरेन्स रॉजर लुम्लेह यांनी मुंबई प्रांतात राज्यपाल राजवट लागू केली होती. ती सलग 7 वर्षे 5 महिने 1946मध्ये मुंबई प्रांत विधानसभेची निवडणूक होईर्पयत अस्तित्वात होती. फेब्रुवारी 1946मध्ये विधानसभेच्या निवडणुका पुन्हा झाल्या आणि बाळासाहेब खेर यांच्याच नेतृत्वाखाली कॉँग्रेसचे सरकार 3क् मार्च 1946 रोजी अधिकारावर आले. यामुळे विधानसभेच्या इतिहासामध्ये 1939 ते 1946 या 7 वर्षात मुंबई प्रांतात पहिल्यांदा राज्यपाल राजवट होती. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर सातत्याने स्थिर आणि बहुमतातील सरकार अधिकारावर होते. जनता पक्षाची राजवट जाऊन केंद्रात इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यावर 198क्मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकार 17 फेब्रुवारी 198क् रोजी बरखास्त करण्यात आले आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्या वेळी राज्याच्या राज्यपालपदी सादिक अली होते. ही राजवट विधानसभेची निवडणूक होईर्पयत राहिली. मे अखेर विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये कॉँग्रेसला बहुमत मिळाले. आणि 9 जून 198क् रोजी राष्ट्रपती राजवट उठून बॅ. अ.र. अंतुले यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यात आले. अशा प्रकारे महाराष्ट्रात आजवर दोनवेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. विशेष म्हणजे या दोन्हीवेळी सत्ताधारी पक्ष बहुमतात होता. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांविरुद्ध खेर मंत्रिमंडळाने राजीनामा दिला होता; तर 198क्मध्ये बहुमतात असलेले पुलोद सरकार राजकीय कारणास्तव बरखास्त करण्यात आले होते. या वेळी तिस:यांदा राष्ट्रपती राजवट लागू करीत असताना कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालीच सरकार होते. पण, ते अल्पमतात आल्याने राजकीय अस्थिरता निर्माण झाली. त्यातूनच महाराष्ट्रात तिस:यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली. या घटनाक्रमातून एक गोष्ट स्पष्ट होते की, महाराष्ट्रात अनेकवेळा राजकीय उलथापालथी झाल्या असल्या तरी, सरकार अस्थिर किंवा अल्पमतात केव्हाच आले नव्हते. या वेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने ते प्रथमच अल्पमतात आले आहे.