उद्धव साळवी , तेरखेडा (उस्मानाबाद)महाराष्ट्राची शिवकाशी म्हणून ओळख असलेल्या तेरखेडा (ता. वाशी) येथील फटाक्यांचा आवाज देशभरात पोहोचला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १० टक्क्यांनी दरवाढ झाली आहे. सद्यस्थितीत १८ कारखान्यांच्या माध्यमातून येथे विविध प्रकारच्या फटाक्यांचे उत्पादन केले जाते. स्थानिकांसोबतच बाहेरगावच्या मजुरांनादेखील येथे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. प्रारंभीच्या काळात सुतळी बॉम्ब, फुलझडी, भुईनळे याची निर्मिती व्हायची. आता बाराही महिने कारखाने सुरू असतात. तेरखेडासह परिसरातील नांदगाव, इंदापूर, गोजवाडा, बावी, खामकरवाडी येथील दोन ते तीन हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. एमआयडीसीचा प्रश्न प्रलंबितआता गावाची हद्द वाढल्याने कारखान्याजवळ लोकवस्ती झाली आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारखान्यांमध्ये स्फोट होऊन काहींना जीव गमवावा लागल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे फटाक्यांच्या कारखान्यांसाठी स्वतंत्र एमआयडीसीची निर्मिती होणे गरजेचे आहे. वाशी तालुक्यातीलच गोजवाडा येथील गायरान जमिनीची मागणी शासनाच्या वतीने करण्यात आली होती, परंतु शेतकऱ्यांनी जमीन देण्यास नकार दिल्यामुळे हा प्रस्ताव रखडला. त्यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या समितीने नांदगाव येथील खासगी जागेत हा उद्योग नेण्याचा अहवाल सादर केला. मात्र, ही सूचनाही लालफितीत अडकून आहे.
आवाज तेरखेडयाचा!
By admin | Published: October 24, 2016 5:22 AM