राजेगाव : आॅगस्ट महिना संपत आला, तरी दौंड तालुक्याचा पूर्व भाग दमदार पावसाअभावी अद्यापही कोरडाच असून, या परिसरातील भूजलपातळी खोल गेल्याने विहिरी व कूपनलिका अजूनही कोरड्याच असल्याचे भयानक चित्र पाहायला मिळत आहे.पाटबंधारे विभागाच्या वसाहतींमध्ये असलेल्या पर्जन्यमापक यंत्रांनुसार आजअखेर दौंडमध्ये १४६ मिलिमीटर, बोरिबेल १५९ मिलिमीटर, रावणगाव २११ मिलिमीटर, भिगवण स्टेशन (राजेगाव परिसर) येथे २४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अतिशय कमी प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याची माहिती बिनतारी यंत्रचालक (दौंड) पोपटराव काळे यांनी दिली.राज्यात मागील महिन्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडून अनेक नद्या दुथडी भरून वाहिल्या, तर काही नद्यांना पूर येऊन पूल वाहून गेले. पण, या भागावर वरुणराजाने आपली वक्रदृष्टी का दाखवली? असा प्रश्न येथील बळीराजाला राहून राहून सतावत आहे. या परिसरातील पिकांसाठी तीन- चार मोठ्या पावसांची गरज असून, जर पाऊस नाही पडला तर पूर्व भागातील शेतकरीवर्गाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.उजनी धरणात ६० टक्के पाणीसाठा झाला असल्याने उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या खानवटे, राजेगाव, नायगाव वाटलूज, मलठण, हिंगणीबेर्डी, शिरापूर इत्यादी गावांतील नागरिकांना मात्र दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या परिसराठी खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांकडून मिळाली. (वार्ताहर)>टेल टू हेड पद्धतीने पाणी सोडायाबाबत शेतकरी एन. डी. गुणवरे व संदीप दसवडकर यांनी सांगितले, की पूर्व भागातील शेतकऱ्यांनी कोरडवाहू क्षेत्रात घेतलेली मका, सोयाबीन, मूग, उडीद, तूर ही शेतातील उभी पिके जळण्याच्या मार्गावर असून, कमी पावसाअभावी धोक्यात आली आहेत. या पिकांची वाढ खुंटली आहे. शेतकरीवर्गाला वाचविण्यासाठी खडकवासला कालव्याला ’ पाणी सोडावे.
राजेगाव परिसर तहानलेला
By admin | Published: August 26, 2016 1:14 AM