ठाणे : ऊनपावसाचा सुरू असलेला खेळ, हंडी फोडण्याच्या जिद्दीने मैदानात जमलेली आणि त्यांच्यातीलच काहींनी राधा-कृष्णाची वेशभूषा केलेली विशेष दिव्यांग मुले, थरांची स्पर्धा नसली तरी हंडी फोडण्याची जिद्द, हंडी फोडल्यावर ढाक्कुमाकुमच्या तालावर थिरकताना त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा एक आगळावेगळा आनंद आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जमलेले प्रेक्षक, असा उत्साही माहोल रंगला होता तो शुक्रवारी ठाण्यातील शिवाजी मैदानात. निमित्त होते ते हिंदुहृद्यसम्राट हृद्यस्पर्शी अवयवदान दहीहंडी उत्सवाचे.बाळगोपाळ मित्र मंडळाच्या माध्यमातून विलास ढमाले हे दहीहंडी महोत्सव आयोजित करतात. यंदाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे यांच्या हस्ते हंडीचे पूजन करण्यात आले. यावेळी खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते अनंत तरे, नगरसेविका पूजा वाघ, आयोजक विलास ढमाले उपस्थित होते. ठाण्याबरोबर अंबरनाथ, डोंबिवली, विक्र ोळी, मालाड, पुणे येथील मतीमंद, गतीमंद, अस्थिव्यंग, अंध, कर्णबधीर, मूकबधीर अशा एकूण १६ शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रत्येक शाळेच्या मुलांना हंडी लावून फोडण्याचा मान मिळाला. विशेष म्हणजे येथे थराची स्पर्धा नसली तरी प्रत्येक शाळेची मुले हंडी फोडण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करत होते. यावेळी उदय आऊटडोअर अॅडव्हेन्चरच्यावतीने अभय शेट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्सीवर चढणे-उतरणे यांची प्रात्यिक्षके करून दाखविण्यात आली. उपस्थित काही मुलांनीही यात सहभाग नोंदवला. याचदरम्यान अवयवदान आणि देहदानाचे मिळून १३४ फॉर्म भरण्यात आले. पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. सहभागी सर्व शाळांना समान रकमेचे पारितोषिक आणि चषक देण्यात आला. >सहानुभूतीपेक्षा जिद्द निर्माण करा - प्रकाश आमटेबाबांनी सुरूवातीपासूनच अशा दिव्यांग लोकांना एकत्र केले. मी आणि माझा भाऊ विकास आमचे बालपण अशाच माणसांमध्ये गेले आहे. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाला अशा विशेष मुलांमध्ये येऊन आपल्या घरी आलो असे वाटतयं, असे मत डॉ.प्रकाश आमटे यांनी व्यक्तकेले. अशा माणसांसाठी समाजाने सहानुभूती दाखविण्यापेक्षा त्यांच्यात जिद्द निर्माण केली पाहिजे. त्यांच्या उद्धारासाठी आपण सहकार्य केले पाहिजे. तर कार्यक्रम कधीही छोटा किंवा मोठा नसतो. तर जिथे जाऊन आपल्याला मोठा आनंद, समाधान मिळेल अशा ठिकाणी आम्ही जातो, असे ते म्हणाले. तर अवयवदान ही मोठी चळवळ असून अवयवांचे दान करून इतरांचे जीवन वाचवले पाहिजे. त्यांच्या जीवनात आपण आनंद फुलवला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
थरांची स्पर्धा नाही पण जिद्दीने फोडली ‘त्यांनी’ हंडी
By admin | Published: August 22, 2016 3:54 AM