- लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : आठ दिवसांपासून बेपत्ता असलेले हार्डवेअर व्यापारी अभय लीलाचंद शहा (वय ५५, रा. आप्पासाहेब पाटीलनगर, शासकीय विश्रामगृहाजवळ, सांगली) यांचा मृतदेह सोमवारी सापडला. कोल्हापूर रस्त्यावरील शत्रुंजय नगरसमोर भंगार बाजाराजवळील उसाच्या शेतातील सरीत त्यांचा कमरेपासून खालील भाग सापडल्याने, त्यांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. त्याच्या खिशातील ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली असून, घटनास्थळी विषाची बाटली सापडल्याने त्यांच्या मृत्यूबाबत गूढ वाढले आहे. अभय शहा यांचे गणपती पेठेत हार्डवेअरचे दुकान आहे. ८ जुलैपासून ते बेपत्ता होते.सोमवारी (दि. १७) दुपारी बारा वाजता कोल्हापूर रस्त्यावरील शत्रुंजय नगरसमोर भंगार बाजाराजवळील उसाच्या शेतातील सरीत कमरेपासून खालील भाग असलेला मृतदेह सापडला. पॅन्टच्या खिशात सापडलेल्या ओळखपत्रावरून, हा अर्धा मृतदेह बेपत्ता व्यापारी अभय शहा यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेहापासून पाच-सहा फूट अंतरावर विषारी द्रव्याची बाटली आढळून आली. तेथे उलटी केल्याचेही दिसून आल्याने, शहा यांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी वाटले. पण अर्धाच मृतदेह सापडल्याने त्यांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त होत आहे.
घातपात की आत्महत्या?बेपत्ता शहा यांचा अर्धा मृतदेह तब्बल दहा दिवसांनंतर, तोही सांगलीतच सापडल्याने त्यांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. शेजारी विषारी द्रव्याची बाटली सापडल्याने, त्यांच्या आत्महत्येची चर्चा आहे. तसेच मृतदेह अर्धाच सापडल्याने घातपाताचाही संशय व्यक्त केला जात आहे. नेमके काय घडले असावे, याचा अंदाज पोलिसांनाही बांधता आलेला नाही. नातेवाईक दु:खात असल्याने त्यांच्याकडून काहीच माहिती मिळालेली नाही.