मुंबई - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षातील नेते सैरभैर झाल्याचे चित्र होते. त्यातच राज्यातील विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर आली आहे. लोकसभा निवडणुकीतील निकाल पाहता, भाजप सहज सत्ता मिळवणार, अस बहुतांशी नेत्यांनी गृहितच धरले आहे. त्यातच आपल्या वारसांना राजकारणात सक्रिय केलेल्या नेत्यांना अधिकच चिंता आहे. त्यामुळे पक्षांतर करून त्यांनाही सत्तेचा प्रत्यक्ष उपभोग घेता यावा ही या पक्षांतरामागील बाजू असण्याची शक्यता आहे.
एकट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ३० हून अधिक मोठ्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये अनेक नेते विद्यमान आमदार होते. लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदार संघ राष्ट्रवादीने काँग्रेसला न सोडल्यामुळे तत्कालीन विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून ते विजयी झाले. त्यामुळे सहाजिकच सुजय विखे सत्ताधारी पक्षात खासदार म्हणून स्थिरावले. त्यांच्या पाठोपाठ वडील राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपमध्ये सामील होऊन मंत्रीपदी विराजमान झाले. त्यामुळे आता दोन्ही बाप-लेक सत्ताधारीच झाले.
राष्ट्रवादीची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी देखील मुलाच्या इच्छेखातर भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे म्हटले. वैभव पिचड यांनी लोकसभेला राष्ट्रवादीला अकोले मतदार संघातून आघाडी मिळावून दिली. परंतु, ऐनवेळी त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. एकूणच वैभव पिचड यांनाही विरोधीपक्षाचा आमदार म्हणून राहण्याची इच्छा नाही, हे स्पष्टच आहे.
पिचड यांच्या पाठोपाठ विदर्भातील राष्ट्रवादीचे एकमेव नेते आणि आमदार मनोहर नाईक यांचे चिरंजीव इंद्रनील नाईक देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. खुद्द इंद्रनील यांनीच आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे म्हटले. पुसद येथील कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर इंद्रनील शिवसेनेत जाणार असल्याचे मनोहर नाईक यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. त्याचवेळी ययाती आणि इंद्रनील या दोन्ही मुलांना सांभाळून घेण्याचे आवाहन मनोहर नाईक यांनी कार्यकर्त्यांना केले. मोहिते पाटील कुटुंबियांचे देखील असंच झाले. आधी रणजितसिंह मोहित पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादीला माढा मतदार संघातून जोरदार धक्का दिला. तर मुंबईतील नाईक कुटुंबीय देखील त्यांच मार्गाने निघाले आहे.
एकंदरीतच भाजपच्या झंझावातासमोर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा निभाव लागणार नाही, असं अनेक नेत्यांनी गृहित धरलं आहे. परंतु, या नेत्यांचा वारसांना विरोधात बसणे अशक्यप्राय वाटत आहे. त्यामुळे वडिलांनी सत्ता उपभोगली तशीच आम्हालाही भोगायची, या मार्गाने नेत्यांच्या मुलांचे पक्षांतर सुरू झालं, असंच म्हणावे लागले.