- अविनाश साबापुरे यवतमाळ : 'आला बाबूराव आता आला बाबूराव..!' हे गाणं गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर 'बापूराव' हे नाव गेल्या ५७ वर्षांपासून विधीमंडळाचे सभागृह गाजवत आहे. १९६२ ते २०१९ पर्यंतच्या विधानसभा निवडणुकांचा धांडोळा घेतला, तर नावात बापूराव असलेल्या तब्बल ३० आमदारांनी लोकांच्या मनावर गारुड केल्याचे दिसते. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर दोनच वर्षात विधानसभेची पहिली निवडणूक घेतली गेली. या पहिल्या निवडणुकीपासून सुरू झालेले बापूराव या नावाचे राजकीय महात्म्य आजतागायत कायम असल्याचे दिसते. नावात बापूराव वागविणारे तब्बल ३० जण आजपर्यंत आमदार झाले आहेत. त्यात सहा जण थेट बापूराव आहेत. तर २४ जणांच्या पिताश्रींचे नाव बापूराव आहे. पहिल्या विधानसभेत उद्गीर मतदारसंघातून विठ्ठलराव बापूराव खडीवाले, वर्ध्यातून बापूराव मारोतराव देशमुख, तर यवतमाळातून जांबूवंतराव बापूरावजी धोटे आमदार झाले. लगोलग १९६७ च्या निवडणुकीतही जांबूवंतराव बापूरावजी धोटे विजयी झाले. त्याचवेळी अकोले (अहमदनगर) मतदारसंघातून बापूराव कृष्णाजी देशमुख आमदार झाले होते. १९७२ मध्ये उद्गीरचे विठ्ठलराव बापूराव खडीवाले पुन्हा एकदा आमदार झाले. १९७८ च्या निवडणुकीत पुन्हा तीन आमदार नावात बापूराव घेऊन सभागृहात पोहोचले. यवतमाळातून जांबूवंतराव बापूरावजी धोटे, वणीतून (यवतमाळ) बापूराव हरबाजी पानघाटे आणि वलगावमधून (अमरावती) अंबादास बापूराव साबळे हे तिघे यावेळी आमदार झाले. पुलोदचे सरकार जाऊन दोनच वर्षात १९८० मध्ये निवडणुका झाल्या. यातही पुन्हा एक बापूराव आणि दोन ह्यबापूरावपुत्रह्ण निवडून आले. त्यात बापूराव हरबाजी पानघाटे, राजुराचे (चंद्रपूर) प्रभाकर बापूराव मामुलकर, वलगावचे अंबादास बापूराव साबळे यांनी बाजी मारली. १९८५ मध्ये प्रभाकर बापूराव मामुलकर यांचा फेरविजय झाला, तर हदगावमधून (नांदेड) बापूराव शिवराम आष्टीकर पाटील विजयी झाले. १९९० मध्ये वणीतून वामनराव बापूराव कासावार, बापूराव शिवराम आष्टीकर पाटील, बिलोलीमधून (नांदेड) भास्करराव बापूराव खतगावकर पाटील विजयी झाले. १९९५ मध्ये तर बापूराव नावाचा चौकार बसला. वणीतून वामनराव बापूराव कासावार, चिमूरमधून (चंद्रपूर) रमेशकुमार बापूराव गजबे, हदगावमधून सुभाष बापूराव वानखेडे आणि बिलोलीचे भास्करराव बापूराव खतगावकर पाटील सभागृहात पोहोचले. वामनराव बापूराव कासावार सुभाष बापूराव वानखेडे यांनी पुन्हा १९९९ मधील निवडणूक जिंकली. सुभाष वानखेडे आणि भास्करराव खतगावकर यांनी पुन्हा २००४ मध्येही आमदारकीत बाजी मारली. तर २००९ मध्ये वामनराव कासावार आणि वर्ध्याचे सुरेश देशमुख हे बापूरावपुत्र आमदार झाले. २०१४ मध्ये मात्र वणी मतदारसंघात बदल झाला. तेथे संजीवरेड्डी बापूराव बोदकुरवार विजयी झाले. तर हदगावमध्ये नागेश बापूराव आष्टीकर पाटील विजयी झाले. विशेष म्हणजे २०१९ मध्येही संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या रूपाने वणीने पुन्हा एकदा बापूरावपुत्रालाच आमदारकी बहाल केली.
सर्वाधिक विदर्भातून, त्यातही यवतमाळचे वर्चस्वराजकारणात विभुतीपूजा काही नवी नाही, महाराष्ट्राच्या राजकारणात तर नेत्यांचे नाममहात्म्य अगदी विचारमहात्म्यालाही फिके पाडणारे आहे. १९६२ ते २०१९ पर्यंतच्या विधानसभा निवडणुकांचा धांडोळा घेतल्यास तब्बल ३० बापूराव किंवा बापूरावपुत्र महाराष्ट्रात आमदार झाले. यात विदर्भातून सर्वाधिक १८ वेळा या नावांनी आमदारकी पटकावली. त्यात दोन अमरावतीतून तीन वेळा चंद्रपूर जिल्ह्यातून झाले. तर चक्क ११ वेळा यवतमाळ जिल्ह्यातून बापूराव नाव धारण करणारे आमदार झाले.