सुरेश लोखंडे/ ठाणेआदिवासी, दुर्गम भागातील कुपोषण व बालमृत्यू रोखण्यासाठी विविध उपाययोजना जिल्ह्यात सुरू आहेत. तरीदेखील अवघ्या सात महिन्यांत १८२ बालमृत्यू झाल्याची नोंद आढळून आली आहे. यामध्ये एक ते सहा वर्षे वयोगटांतील बालकांचा समावेश आहे. मातामृत्यू, बालमृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी जिल्ह्यात कोट्यवधी रुपये खर्च करून उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, प्राप्त झालेल्या बालमृत्यूंची संख्या पाहता त्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचे प्रयत्न काही सामाजिक संघटनांकडून केले जात आहेत. जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या तालुक्यांत २०१६च्या एप्रिल ते नोव्हेंबर या सात महिन्यांत ही बालके दगावली आहेत. यामध्ये एक ते सहा वर्षाच्या २० बालकांचा समावेश आहे. तर, ७१ बालके एक वर्षापर्यंतची आहेत आणि शून्य ते सहा वर्षापर्यंतची ९१ बालके दगावलेली आहेत. दगावलेल्या बालकांमध्ये कमी वजनाची, जन्मत: व्यंग, हृदयविकार, हायपोथर्मिया, अॅस्पिरेशान न्यूमोनिया, अॅस्पेक्शिया, श्वासावरोध, हेमॅटीमिसिस, सेप्टीसिमिया, अतिज्वर, ज्वर झटके, सर्पदंश, अननोन बाइट, नेफियटीक सिंड्रोम, एचआयव्ही बाधित, न्यूमोनिया आणि इतर आजारांस बळी पडून हे बालमृत्यू झाल्याचे गाभा समितीच्या बैठकीत उघड झाले. (प्रतिनिधी)
ठाण्यात सात महिन्यांत १८२ बालमृत्यू
By admin | Published: January 10, 2017 4:35 AM