- श्रीमंत मानेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रविवारी नागपुरात होणारा महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासातील दुसराच प्रसंग असेल. तेहतीस वर्षांपूर्वी, डिसेंबर १९९१ मध्ये शिवसेनेच्या पहिल्या फुटीनंतर बंडखोर आमदारांपैकी छगन भुजबळ व डाॅ. राजेंद्र गोडे यांच्यासोबत काँग्रेसच्या पाच मंत्र्यांनी नागपूरमध्ये शपथ घेतली होती. यानिमित्ताने अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी त्या शपथविधीच्या आठवणींना ‘लोकमत’शी बोलताना उजाळा दिला.
कॅबिनेट मंत्री भुजबळ आणि बुलढाण्याचे डाॅ. गोडे यांच्यासोबत अमरावतीच्या वसुधाताई देशमुख, आमगावचे भरत बाहेकर, ठाण्याचे शंकर नम, बीडचे जयदत्त क्षीरसागर व धुळ्याच्या शालिनी बोरसे या सहा उपमंत्र्यांनी २१ डिसेंबर १९९१ रोजी नागपूरमध्ये शपथ घेतली होती. स्व. सुधाकरराव नाईक त्यावेळी मुख्यमंत्री होते. हिवाळी अधिवेशनावेळीच ५ डिसेंबर १९९१ रोजी शिवसेनेतील फुटीचे महाभारत घडले होते. त्याबद्दल भुजबळ सांगतात, शिवसेनेचे ३६ आमदार आपल्यासोबत होते. तथापि, बाळासाहेबांच्या भीतीने १८ उरले. प्रत्यक्ष बाहेर पडताना बाराच राहिले. ही संख्या एकतृतीयांशपेक्षा कमी होती. आपली आमदारकी गेली, असे समजून निराश झालो. बाळासाहेब व शिवसैनिकांच्या भीतीने आम्ही लपून होतो. तथापि, कसेबसे वाचलो आणि मी व डाॅ. गोडे यांनी इतरांसोबत शपथ घेतली. मला महसूल, तर उपमंत्री डाॅ. गोडे यांना गृहखाते मिळाले.
मधुकरराव चाैधरींचा ऐतिहासिक निवाडाशिवसेनेतील या फुटीसंदर्भात तत्कालीन विधानसभाध्यक्ष मधुकरराव चाैधरी यांनी दिलेल्या ऐतिहासिक निकालाचे महत्त्व मोठे होते, असे सांगून भुजबळ म्हणाले की, आमदारांची संख्या १८ म्हणजे फुटीर गटाला मान्यतेसाठी पुरेशी होती. त्यातील ६ नंतर फुटले तर ती संख्यादेखील एकतृतीयांशपेक्षा अधिक असल्याने कोणीही अपात्र ठरत नाही, हा निकाल चाैधरींनी दिला.
तेव्हा शिवसेनेचे संतप्त, आक्रमक आमदार अध्यक्षांच्या आसनापर्यंत पोहोचले. तेव्हा, तुम्हाला मला मारायचे असेल तर मारा; पण मी माझा निर्णय बदलणार नाही, असे बाणेदार उत्तर चाैधरी यांनी दिले. नंतर त्यांचा हा निर्णय उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयानेही उचलून धरला.