Sanjay Raut ( Marathi News ) : वक्फ दुरुस्ती विधेयकाचे कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, लोकसभा नंतर राज्यसभेतून मंजुरीनंतर आता फक्त राष्ट्रपतींच्या मंजुरीची प्रतिक्षा आहे. संसदेत विरोधी पक्षांचा तर रस्त्यावर विविध मुस्लिम संघटनांचा विरोध असतानाही हे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर करून घेण्यात सरकारला यश आले आहे. दरम्यान, आता या विधेयकाविरोधात काँग्रेसच्या एका खासदाराने तर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही या विधेयकाविरुद्ध याचिका दाखल केली आहे. यावरुन आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. राऊत यांनी आमच्यासाठी ही फाईल बंद झाल्याचं मोठं विधान केले आहे.
"घबराए नही...हम सिखाएंगे आपको मराठी भाषा"; उद्धवसेनेची साद, पण बॅनरवरील मराठीतच चुका
वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात विरोधी पक्षांमध्ये एकी दिसत नाही. काल काँग्रेसचे खासदार मोहम्मद जावेद यांच्यासह एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही याचिका दाखल केली आहे. द्रमुकने या विधेयकाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्याची घोषणा केली आहे. पण, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 'आमच्यासाठी ही फाईल बंद झाली आहे',असं मोठं विधान केलं आहे. यामुळे आता इंडिया आघाडीमध्ये वक्फ विधेयकावरुन एकी दिसत नाही.
खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये हे विधान केले. संजय राऊत म्हणाले की, आम्ही आमचे काम केले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात जे काही बोलायचे होते ते बोलले आहे. ही फाईल आता आमच्यासाठी बंद आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार नाही, असंही राऊत म्हणाले.
विधेयक जमिनी बळकावण्यासाठी आणले- राऊत
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दोन्ही सभागृहात या विधेयकाला विरोध केला. संजय राऊत म्हणाले की, हे विधेयक मुस्लिम हितांचे रक्षण करण्यासाठी आणले नाही, तर ते व्यापार किंवा व्यवसायासारखे पाऊल आहे. सरकारचे लक्ष मुस्लिमांच्या कल्याणापेक्षा मौल्यवान वक्फ मालमत्ता आणि जमिनी ताब्यात घेण्यावर आहे. त्यांची अंदाजे किंमत सुमारे २ लाख कोटी रुपये आहे.
"आम्ही आमचा मुद्दा मांडू आणि त्याला विरोध करू. हे विधेयक मुस्लिमांची किंवा त्यांच्या मालमत्तेची काळजी घेण्यासाठी नाही तर मुस्लिमांच्या जमिनी बळकावण्यासाठी आणले आहे. जेव्हा ते जमीन पाहतात तेव्हा ते वेडे होतात. ते लवकरच वक्फ जमीन बळकावतील", असा आरोपही खासदार राऊतांनी केला.