छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे हे आमच्या जिवावर मुख्यमंत्री झाले आहेत, असे विधान शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी येथे केले. एकाने पत्नी आत्महत्या करेल, दुसऱ्याने राजीनामा देतो, तर तिसऱ्याने नारायण राणे संपवतील, अशी गळ तीन आमदारांनी मुख्यमंत्र्यांना घातली. त्यामुळे पेचात पडलेल्या मुख्यमंत्र्यांना संबंधित आमदारांना मंत्रिपद द्या असे सांगून मी आजपर्यंत मंत्रिपदापासून दूर राहिल्याची खंत देखील भरत गोगावले यांनी बोलून दाखवली.
भरत गोगावलेंच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची मुख्यंमंत्र्यांसोबत काय व कशी चर्चा झाली मला माहित नाही. पण प्रत्येकाने त्याग केल्यानेच हे सरकार झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल प्रत्येकाच्या भावना मजबूत होत्या. मी काम करणारा व्यक्ती म्हणूण त्यांच्याकडे पाहतो, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं. तसेच मी थांबून जातो यांना मंत्री करा या भूमिका घेतल्यानेच गोगावले मागे राहिल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
दिव्यांग मंत्रालय स्थापन झाल्यावर मला दिव्यांग मंत्रालय अभियानाचा प्रमुख केल आहे. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन दिव्यांगांच्या तक्रारी ऐकून त्यावर तज्ञांकडून कायमस्वरूपी धोरण आखण्यासाठी 3 डिसेंबर पर्यंत आणायचं आमचं प्रयत्न राहील. इथून पुढे दिव्यांगांसाठी सरकार जागोजागी कसं त्यांच्यासोबत उभं राहील यासाठी आमचे प्रयत्न आहे, अशं बच्चू कडू म्हणाले.
भरत गोगावले कोण आहेत?
कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या नेत्यांपैकी एक भरत गोगावले आहेत. सरपंच ते आमदार आणि आता शिवसेनेतील बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद असा प्रवास भरत गोगावलेंचा आहे. २००९ नंतर २०१४ आणि २०१९ अशा सलग तीन वेळा भरत गोगावले महाड मतदारसंघात शिवसेनेचं आमदार म्हणून प्रतिनिधित्त्व करत आहेत. शेतकरी कामगार पक्षाचा सुद्धा एक गड रायगड जिल्ह्यात आहे. असं असतानाही भरत गोगावलेंनी जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवली आणि महाडमध्ये आपले पाय रोवले.