अजितदादा नसते तर हे सरकार टिकलं नसतं; राष्ट्रवादी आमदाराची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 04:14 PM2022-06-11T16:14:10+5:302022-06-11T16:14:54+5:30
जर माझ्यावर अन्याय होत असेल तर त्यासाठी काहीतरी भूमिका घेतली पाहिजे असं नाराज आमदाराने सांगितले.
पुणे - राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या चौथ्या उमेदवाराचा पराभव करून भाजपानं बाजी मारली आहे. या निवडणुकीत मविआच्या अपक्ष आणि घटक पक्षांशी काही मते फुटली आणि त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवाराला बसला. शिवसेनेचे संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीत असलेल्या नाराज आमदारांची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
यात राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांनीही त्यांची नाराजी बोलून दाखवली आहे. दिलीप मोहिते म्हणाले की, गेल्या दोन अडीच वर्षापासून आमचा कुणी विचार केला नाही. मंत्रालयात आल्यावर अजितदादांना भेटायचो. सगळ्या समस्या त्यांना सांगायच्या. सगळ्या पक्षातील आमदारांना मदत करण्याचं काम ते करतात. अजित पवार नसते तर हे सरकार टिकलं नसतं. आमच्यासारख्या आमदारांचा ते विचार करतात. तर बाकीच्यांनी का करू नये? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
इतकेच नाही तर जर माझ्यावर अन्याय होत असेल तर त्यासाठी काहीतरी भूमिका घेतली पाहिजे. गेली वर्षभर आमच्या अनेक फाईल्स मंत्रालयात पडून आहेत. त्या माझ्या वैयक्तिक नाही. पंचायत समिती इमारत, प्रशासन इमारत, पोलीस स्टेशनची इमारत तालुक्याकरता आहे. मी त्याला निधी द्या म्हणतोय त्याला आडकाठी आणण्याचा प्रयत्न करू नये. असं राजकारण करू नये. आमचं राजकारण अजित पवार यांच्यावर अवलंबून आहे. त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. स्वत: मुख्यमंत्र्यांना फोन केला परंतु तरीही त्यांनी ऐकलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांबद्दल माझी नाराजी आहे असं स्पष्टपणे आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले.
अपक्ष आमदारांची मते मिळाली नाहीत - शिवसेना
राज्यसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीत संजय पवार यांना ३३ मते मिळाली होती. तर, धनंजय महाडिकांना २७ मते मिळाली आहेत. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. धनंजय महाडिकांना ४१ मते मिळाली. संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपावर टीका करत घोडेबाजार केल्याचा आरोप केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, भाजपाने जो घोडेबाजार केला, तो राज्यातील सर्व जनतेने पाहिला. काहींवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणण्यात आला. काही ठिकाणी इतर काही व्यवहार आहे. ठीक आहे आज ते जिंकले असतील. पण आम्ही उद्या पाहू, असं संजय राऊत म्हणाले. तसेच बहुजन विकास आघाडीचे तीन आमदारांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, स्वाभिमान पक्षाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी शिवसेनेला मतं दिली नाहीत, ज्यांनी शब्द देऊन दगाबाजी केली, त्यांची यादी आमच्याकडे आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.