पंढरपूर वारीच्या इतिहासात असं घडलं नव्हतं; काँग्रेस-राष्ट्रवादीचा सरकारवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 08:19 PM2023-06-11T20:19:50+5:302023-06-11T20:20:15+5:30
प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे हे घडल्याचं दिसत आहे. ही संपूर्ण घटना दु:खदायक, तशीच मनाला चीड आणणारी आहे असं विरोधकांनी म्हटलं.
मुंबई - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीं पालखीच्या आळंदीहून प्रस्थान सोहळ्यावेळी वारकरी बांधवांवर झालेल्या पोलिस लाठीमाराची घटना क्लेषदायक आहे. महाराष्ट्राच्या संत, भक्तीपरंपरेचं वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्या इतिहासात असं यापूर्वी घडलं नव्हतं. आजची घटना मनाला दु:ख देणारी आहे. सोहळ्याचं योग्य नियोजन करुन हा प्रसंग टाळता आला असता, परंतु तसं घडलं नाही. वारकऱ्यांवरील पोलिस लाठीमाराचा आणि लाठीमार करणाऱ्या सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध करतो अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राला पंढरपूरच्या आषाढीवारीची गौरवशाली परंपरा आहे. आषाढी वारी आणि आळंदीहून निघणारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हे आपल्या महाराष्ट्राच्या अध्यात्म, भक्तीपरंपरेचं वैभव आहे. दरवर्षी वारीसाठी हजारो वारकरी आळंदीत येतात. वारी आणि प्रस्थान सोहळ्याचं योग्य नियोजनही केलं जातं. वारकरीही या नियोजनाला सहकार्य करत असतात. परंतु, यंदा कुठेतरी चूक घडलेली दिसत आहे. प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे हे घडल्याचं दिसत आहे. ही संपूर्ण घटना दु:खदायक, तशीच मनाला चीड आणणारी आहे. अशी घटना यापुढे घडू नये, यासाठी पूर्ण काळजी घेण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
तसेच कुठल्याही आध्यात्मिक कार्यात आणि पंढरपूरवारी सारख्या सोहळ्यात सहभागी होतांना, सर्वांनी राजकीय हेतू बाजूला ठेवावा. ईश्वरभक्ती आणि वारकऱ्यांची सेवा हाच हेतू मनात ठेवून, वारीत सहभागी व्हावं, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे.
वारकऱ्यांवर लाठीचार्ज करणा-या शिंदे फडणवीसांचा धिक्कार - काँग्रेस
महाराष्ट्राची समृद्ध परंपरा असलेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या वारकरी संप्रदायाच्या आषाढी वारीला गालबोट लावण्याचे पाप राज्य सरकारच्या पोलिसांनी केले आहे. शांततेत पंढरपूरच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांवर लाठीमार करण्यापर्यंत शिंदे-फडणवीसांच्या मुजोर पोलिसांची मजल गेली आहे. वारकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या मुजोर पोलीस व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
पटोले म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकार हे महाराष्ट्राला लागलेले ग्रहण आहे. या राज्यात दररोज गुन्हे घडत आहेत पण गृहमंत्रीपदावरील व्यक्तीला त्याची जरीही चाड नाही. वारकऱ्यांवरील लाठीहल्ला हा शांततेने पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या भक्तांचा व विठुरायाचा घोर अपमान करण्याचा प्रकार आहे. असा प्रकार होऊच कसा शकतो? वर्षानुवर्षे चालत असलेल्या या पंरपरेला गालबोट लावण्याचे पाप करण्याचे धाडस पोलीस कसे काय करु शकतात? पोलीसांना कोणी अधिकार दिला वारकऱ्यांवर लाठीमार करण्याचा? पोलीस कोण आहेत वारकऱ्यांच्या हक्कात बाधा आणणारे ? वारीचे नियोजन करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. गृहमंत्री म्हणून फडणवीस नापास झाले आहेत तरीही त्यांना खुर्ची सोडवत नाही पण त्यांच्या खुर्चीच्या मोहात पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासला जात आहे असं त्यांनी म्हटलं.