आपल्याला माहीत आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजाला, मागास समाजाला, आदिवासी समाजाला आरक्षणाचा अधिकार दिला. भारतात धर्माच्या आधारावर आरक्षण दिले जाऊ शकत नाही, यावर बाबासाहेब ठाम होते. संपूर्ण संविधान सभेने 75 वर्षांपूर्वी, दीर्घ चर्चा करून निश्चित केले होते की, धर्माच्या आधारावर या देशात आरक्षण दिले जाऊ शकत नाही. मात्र, दलीत, आदिवासी आणि मागास समाजाचे आरक्षण हिरावून धर्माच्या नावावर देण्याची काँग्रेसची इच्छा आहे. ही कल्पना नाही, हे घडले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी अंबाजोगाईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलत होते.
मोदी म्हणाले, "आपल्यालाही आश्चर्य वाटेल... कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे. तेथे ओबीसींना 27 टक्के आरक्षण मिळाले आहे. यांनी रात्रीतूनच एक फतवा काढला, सरकारने आणि कर्नाटकात जेवढे मुस्लीम आहेत, त्या सर्वांना त्यांनी रात्रीतून ओबीसी बनवले. परिणाम काय झाला? ज्या ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण मिळाले होते, बाबासाहेबांनी दिले होते, संविधानाने दिले होते, भारताच्या संसदेने दिले होते, रात्रीतून मुस्लिमांना ओबीसी करून त्यात टाकले. ओबीसींच्या आरक्षणावर रात्रीतून डाका टाकला, चोरी केली. यामुळे मोठा हिस्सा मुस्लिमांकडे गेला. अशा प्रकारचा खेळ आपल्याला मान्य आहे का? असा सवालही मोदींनी यावेळी केला."
"आता असेच काम या देशात, प्रत्येक राज्यात कराची त्यांची इच्छा आहे. आज सकाळीच आणखी एका नेत्याने यांचा कट स्वतःच स्वीकार केला आहे आणि त्यांचे खोटे उघड पाडले आहे. हा तोच नेता आहे, ज्याला चारा घोटाळ्यात न्यायालयाने शिक्षा दिली आहे. इंडी आघाडीतील या नेत्याने अखेर स्वीकारले आहे की, या लोकांची मुस्लिमांना पूर्णच्या पूर्ण आरक्षण देण्याची इच्छा आहे. अर्थात आता, जे एससी, एसटी आणि ओबीसींना आरक्षण मिळते, ते बंद करून, हे लोक पूर्णच्या पूर्ण आरक्षण, मुस्लिमांना देण्याच्या विचारात आहेत. आज सकाळीच त्यांनी म्हटले आहे. ही या देशातील प्रत्येक दलित, मागास आणि आदिवासीसाठी धोक्याची घंटा आहे. यामुळे आपल्याला इंडी आघाडीच्या इराद्यांपासून सावध राहावे लागणार आहे.
"बंधूंनो, हा मोदी आहे. आपणही याला चांगले ओळखता, मी आपल्याला गॅरंटी देतो, जोवर मोदी जीवंत आहे, जगातील कोणतीही शक्ती दलितांचे, आदिवासींचे ओबीसींचे, मागासांचे आरक्षण हिरावू शकत नाही. ही मोदीची ताकद आहे," असा विश्वासही यावेळी मोदींनी जनतेला दिला.