राज्यात विधान परिषद निकालात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्यानंतर शिवसेनेतील नाराजी आता उघड झाली आहे. निकाल लागल्यानंतर सोमवार संध्याकाळपासूनच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल होते. त्यांच्यासह शिवसेनेचे अनेक आमदार गुजरातला थांबल्याचे आता समोर आले आहे. या शिवसेनेतील बंडावर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार सध्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी दिल्लीत आहेत. तेथूनच त्यांनी राष्ट्रवादीची भूमिका जाहीर केली. दरम्यान, हा शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली.
“उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाची अंतर्गत बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर त्यांचं अंतर्गत जे काही बोलणं होईल, त्यानंतर आम्ही त्यांच्याशी बोलू आज हा मुद्दा शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा आहे,” असं शरद पवार म्हणाले.
काहीही परिणाम होणार नाही"विधान परिषद निवडणुकीत आमच्यात अजिबात नाराजी नाही. आमच्या पक्षातील आमदारांनी शिस्तबद्धपणे मतदान केलं आहे. ज्या पक्षांची मतं फुटली आहेत त्यांचेही उमेदवार निवडून आले आहेत. काँग्रेसचा एक उमेदवार पडला आणि त्याबाबत त्यांचीही पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे. क्रॉस वोटिंग झालं तरी सरकार चालतं हा माझा ५० वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे याचा काही परिणाम होणार नाही", असं शरद पवार म्हणाले.
महाविकास आघाडी सरकार बनण्याआधी देखील अशी बंडाळी झाली होती. पण काही होऊ शकलं नाही. सरकारनं यशस्वीरित्या अडीच वर्ष पूर्ण केल्यामुळे अशी कारस्थानं केली जात आहेत, असंही शरद पवार म्हणाले. सध्या निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर काहीतरी मार्ग निघेल असा आम्हाला विश्वास आहे, अस शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.