'दडपशाही दिल्लीवाले करतात, ही लोकशाही'; अजितदादांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 11:12 PM2023-12-25T23:12:03+5:302023-12-25T23:15:02+5:30
अजित पवारांच्या एका विधानानंतर राजकीय चर्चांना उधाणा आले आहे. याचदरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उभा करणार. या निवडणुकीत आमचा उमेदवार आम्ही निवडून आणूच. अमोल कोल्हे यांना तिकीट नाकारण्यात आले होते. त्यांना तिकीट कोणामुळे मिळाले? हे विचारा, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
निवडून आल्यानंतर दीड महिन्यामध्ये अमोल कोल्हे राजीनामा द्यायला निघाले होते. गेल्या पाच वर्षात ते मतदारसंघात दिसले नाही. त्यामुळे त्यांचेच मन त्यांना खायला लागले आहे. मात्र, शिरूर लोकसभेमध्ये महायुतीचा उमेदवार उभा करणार आणि तो निवडून आणणार. मी जे बोलतो ते करतोच त्यामुळे अमोल कोल्हे यांचा पराभव करणारच, असे अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवारांच्या या विधानानंतर राजकीय चर्चांना उधाणा आले आहे. याचदरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ही लोकशाही आहे. दडपशाही दिल्लीवाले करतात. विरोधात बोलला की संसदेतून बाहेर काढा. ईडी-सीबीआय भीती दाखवा. आमच्यासाठी ही लोकशाही आहे. त्यामुळे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आम्ही सत्तेत असताना कोणावर असले उद्योग व सुडाचे राजकारण केले नाही आणि कधी करणार ही नाही, असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.
दादा त्या ५ वर्षांचं आता का बोलले?
दादांनी माझी नेहमीच पाठराखण केली आहे. आदरणीय दादा हे फार मोठे नेते आहेत. इतक्या मोठ्या नेतृत्वावर बोलणं माझ्यासाठी उचित ठरणार नाही. काही चुकलं तर कान पकडण्याचा अधिकार आहे. पहिल्याच टर्म मध्ये २ वेळा संसदरत्न मिळाला, बैलगाडा शर्यत प्रश्न सोडवला, संसदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं, तेव्हा जर काही चुकलं असत तर त्यांनी कान धरले असते. कोविडच्या काळात दादा सर्वाधिक बैठक घेत होते. त्यावेळी कोण अटेंड्स करत होत. हे त्यांनाही माहित आहे. इंद्रायणी प्रकल्प कोणी पुढाकार घेतला हे दादांना माहित असेलच. चार पाच वर्षात मी काम केलं नसत तर त्यांनी तेव्हाच माझे कान धरले असते. ते आता का बोलले हा प्रश्न मला पडतोय.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
५ वर्षात एका खासदाराने त्याच्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं. त्यांनी मतदारसंघ दुर्लक्षित केलं होतं. त्यांना निवडून आणण्यासाठी मी स्वतः जीवाचे रान केलं होतं. मी बोलणार नव्हतो. पण यांना आता उत्साह आला आहे. कोणाला पद यात्रा सुचते कोणाला संघर्ष यात्रा काढायची आहे. आम्हाला वाटले होते ते वक्ते उत्तम आहे. संभाजी महाराज यांच्याबद्दल उत्तम भूमिका त्यांनी बजावली होती. शिरूरमध्ये पर्याय देणार तुम्ही काळजीच करू नका तिथे असलेला उमेदवार निवडूनच आणणार असल्याचा विश्वास अजित पवार यांनी यावेळी दाखवला आहे.