मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी "हा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है…" असं म्हणत सूचक विधान केलं आहे. तसेच "दीड वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही. गावीही जनता दरबार असतो. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतो. फोटोग्राफी करत नाही. फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती केलेली कधीही चांगली" असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
"मिलिंद देवरा यांचे शिवसेनेत मनापासून स्वागत करतो. ते सपत्नीक आलेत, वहिनींचे देखील स्वागत करतो. शेवटी कुठलाही निर्णय घेताना यशस्वी पुरुषाच्या मागे महिलेची ताकद असते. आपण निर्णय घेताना ज्या भावना होत्या, दीड वर्षापूर्वी त्याच भावना माझ्या मनात होत्या. निर्णय घेताना धाडस करावं लागतं. परिस्थितीमुळे निर्णय घ्यावे लागतात. मी ज्या वेळेस हा निर्णय घेतला तेव्हा श्रीकांतच्या आईला विश्वासात घेतलं" असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
"काही गोष्टी उघडपणे सांगता येत नाहीत. काही ऑपरेशन असे करायचे असतात की सुई पण टोचली नाही पाहिजे. डॉक्टर नसतानाही मी दीड वर्षापूर्वी ऑपरेशन केलं. कुठे टाकाही लागला नाही. मिलिंद देवरा यांचं स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा. गेल्या 50 वर्षांपासून काँग्रेस सोबत आपल्या कुटुंबाची नाळ जोडली होती. मुरली देवरा यांचं देशासाठी योगदान आहे. आपण खासदार आणि मंत्रीही होतात. काही माणसं स्वत:साठी जगत नसतात. ते देशासाठी जगत असतात."
"आज काही प्रमुख लोकांचा प्रवेश होईल असं तुम्ही सांगितलं होतं. त्यामुळे हा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. आरोप प्रत्यारोपाच्या भानगडीत न फसता आपलं काम करत राहायचं. मी देखील तेच करतो. मी सकाळी उठून रस्ते धुवण्याचं काम करतो त्यामुळे चहल सुद्धा त्यात असतात. आमदार आणि खासदारही पाण्याने रस्ते धुवत आहेत. मुंबईकरांना पहिल्यांदा हे पाहायला मिळालं. जनता सुज्ञ आहे. मी पातळीसोडून कधी बोलत नाही" असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.