लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर बारामतीची लढाई ही दोन वेगळ्या राजकीय विचारांची लढाई झाली आहे. पत्नी म्हणून मी त्यांची साथ देणे, हे माझे कर्तव्य होते. त्यातून लोकसभेच्या उमेदवारीसाठी आपण होकार दिला. आता जिंकण्याचा निर्धार केला आहे, असे मत बारामती लोकसभा मतदारसंघातील ‘महायुती’च्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले. ‘लोकमत डिजिटल’ला दिलेल्या मुलाखतीत सुनेत्रा पवार यांनी अनेक बाबींचा खुलासा केला.
राजकारणात येऊन निवडणूक लढवावी लागेल, हा विचार आधी कधी केला नव्हता; पण कटू प्रसंगाने हे घडलेले आहे. अजित पवारांची पत्नी तर आहेच; पण आता उमेदवार म्हणून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
‘विकासाच्या मुद्द्यावरच लढत’ अजित पवार हे अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. अनेक संधी त्यांच्याकडे आलेल्या होत्या. कदाचित त्यांना अजून चांगल्या गोष्टी करता आल्या असत्या; पण त्या करता आल्या नाहीत. म्हणूनच अजित पवार यांनी विचारपूर्वक भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे अजित पवार यांचे राजकारण मर्यादित झालेले नाही, असे सांगून सुनेत्रा पवार यांनी आपण ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढत असल्याचे स्पष्ट केले. मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गरजा आहेत. काही ठिकाणी एमआयडीसी, पुरंदरचे विमानतळ, पाणीटंचाई तसेच रोजगाराचा प्रश्न सोडवण्यास प्राधान्य राहील, असे त्या म्हणाल्या.राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर सुरुवातीला स्थानिक नेत्यांमध्ये संदिग्धता होती. पण उमेदवारी मिळाल्यानंतर स्थानिक नेते, कार्यकर्ते यांच्या मनातला संभ्रम दूर झाला. सर्वजण एकदिलाने कामाला लागले. महायुतीचे सर्वच कार्यकर्ते, नेते हे सोबत होते. एकप्रकारे अजित पवारांनी केलेला बारामतीचा विकास, इतर तालुक्यातील प्रलंबित प्रश्न या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जात आहे.
पवार कुटुंबियांमध्ये ही नात्यांची लढाई नसून, वैचारिक राजकीय लढाई असल्याचे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे, तेव्हा बारामतीचा खासदार आपलाच पाहिजे, याचा अजित पवारांनी निश्चय केलाय. त्यामुळे ही वैचारिक लढाई असून, सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी थेट लढत इथे होते आहे. पण नात्यात भावनिक राजकारण आणले गेले. त्याचा सहानुभूतीसाठी वापर झाला. पण बारामती मतदारसंघात महायुतीचे चार आमदार आहेत, तिथे चांगल्या प्रकारे मतदान आपल्याला होईल. जिथे आमदार नाहीत, तिथेही मते मिळतील असा विश्वास सुनेत्रा पवारांनी व्यक्त केला.
‘नात्यात राजकारण आणणे चुकीचे’ अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर आता नात्यात राजकारण आणणे चुकीचे आहे. राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी ठेवले तरच चांगले. पवार कुटुंब विभागल्यानंतर अजित पवारांनी मला दिल्लीतले राजकारण सांभाळण्यास लोकसभेच्या रिंगणात उतरवलेले आहे. अजित पवारांनी बारामती तालुक्याचा विकास केला, तसा बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला नाही, असा दावा सुनेत्रा पवार यांनी केला.