महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आज राज्यातील सत्ताधारी महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमधून सरकारचं रिपोर्ट कार्ड समोर ठेवलं. दरम्यान, महायुतीकडूस सरकारचं रिपोर्टकार्ड सादर करण्यात आल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यावर जोरदार टीका केली आहे. हे महायुती सरकारचं रिपोर्ट कार्ड नाही तर डिपोर्ट कार्ड आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
महायुती सरकारकडून सादर करण्यात आलेल्या रिपोर्ट कार्डबाबत प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आताच काही क्षणांपूर्वी भाजपा, शिंदे आणि अजितदादा यांनी त्यांचं रिपोर्ट कार्ड प्रकाशित केलं आहे. आता महाराष्ट्र या रिपोर्ट कार्डचं नाव बदलून डिपोर्ट कार्ड ठेवणार आहे, असं मला वाटतं. कारण गेल्या दोन वर्षांत त्यांनी महाराष्ट्रातून अनेक गोष्टी डिपोर्ट केल्या आहेत. मग ते उद्योग असोत, त्यात वेदांता फॉक्सकॉर्न असेल, एअरबस-टाटा असेल, बल्कड्रग असेल, मेडिकल डिव्हाईस पार्क असेल, भाजपाने इथून हलवलेलं इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर असेल किंवा डायमंड मार्केट असेल, अनेक गोष्टी इथून हलवून गुजरातला डिपोर्ट करण्यात आल्या, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, मी दसऱ्याच्या दिवशी म्हणालो त्याप्रमाणे महाविकास आघाडीचं सरकार येताच आमचे तीन महत्त्वाचे प्राधान्यक्रम राहतील. त्या म्हणजे रोजगार, रोजगार आणि रोजगार. कारण रोजगारदेखील महाराष्ट्रातून डिपोर्ट करण्यात आले आहेत. तसेच भाजपाच्या राज्यात बेरोजगारी ही सगळीकडे दिसत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.