मुंबई-
राष्ट्रपतीपदासाठीच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी भाजपा आणि शिंदे गटातील आमदार विमानतळावर दाखल होऊ लागले आहेत. द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत मुंबईतील द-लीला हॉटेलमध्ये भाजपा आणि शिंदे समर्थक आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार देखील हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि विविध प्रश्नांची उत्तरं दिली.
"द्रौपदी मुर्मू यांच्या माध्यमातून देशाला पहिल्यांदाच एक आदिवासी महिला भगिनी राष्ट्रपतीपदी विराजमान झालेल्या पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे देशातील सर्व आदिवासी बांधवांचा हा सन्मान आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्यासाठीच्या मतदानाची आढावा घेण्यासाठीची बैठक आयोजित केली आहे. त्यासाठी आम्ही सर्व इथं जमले आहोत", असं अब्दुल सत्तार म्हणाले.
मंत्रिपदापेक्षा १८ तास काम करणारा मुख्यमंत्री मिळालाशिंदे गटाला १६ मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अब्दुल सत्तार यांना विचारण्यात आलं असता त्यांनी महत्वाचं विधान केलं. "आम्हाला किती मंत्रिपदं मिळतात किंवा कुणाकुणाला खाती मिळतात यापेक्षा राज्याला १८ तास करणारा मुख्यमंत्री मिळाला हाच आमचा फायदा आहे. त्यामुळे सर्वांनी निश्चिंत राहावं. येत्या १८ किंवा १९ जुलैला विस्तार होऊ शकतो. तसंच एकनाथ शिंदेंचा ज्यांना ज्यांना फोन येईल त्यांना मंत्रिपद निश्चित समजा", असंही अब्दुल सत्तार म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि मुर्मूंच्या भेटीचे संकेतउद्धव ठाकरे यांनीही राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. त्यात आज मुर्मू आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या निमित्तानं त्या 'मातोश्री'वर भेट देणार का? याबाबत विचारण्यात आलं असता अब्दुल सत्तार यांनी वरिष्ठ पातळीवर याबाबत चर्चा झाली असेल तर नक्कीच भेट होऊ शकते असं म्हटलं आहे.