मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नंदुरबार येथे एक जाहीर सभा झाली. नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली आहे. यावरून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून ठाकरे गटासह एनसीपी एसपी पक्षाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. राज्यात फोडाफोडीचे राजकारण करूनही महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता भाजपासोबत जात नसल्याचे दिसताच पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सोबत येण्याची ऑफर दिली. ही ऑफर म्हणजे भाजपा केंद्रात पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, याबाबत शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपा जनमत गमावत आहे. जनमत त्यांच्या विरोधात आहे. त्या अस्वस्थतेतून ते बोलत आहेत. आम्ही ज्या विचारधारेत वाढलो ती विचारधारा सोडून बाहेर जाणार नाही. गांधी-नेहरुंची विचारधारा ही सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारी आहे. हा देश एकसंध ठेवायचा आहे. सर्वांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जावे लागणार आहे, असे म्हणत शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांची ऑफर नाकारली.
नरेंद्र मोदी काय म्हणाले?महाराष्ट्राचे एक दिग्गज नेते ४० वर्षांपासून फिरत आहेत. बारामतीच्या निवडणुकीनंतर ते खूप चिंतेत आहेत. त्यांनी एक विधान केले आहे जे मला वाटते की, त्यांनी अनेकांसोबत चर्चा करुन केले असेल. ते इतके हताश आणि निराश झालेत की त्यांना वाटत आहे की, ४ जूनच्या नंतर राजकारणात टिकून राहायचे असेल तर छोट्या राजकीय पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हायला हवे. याचा अर्थ असा की, जी नकली राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे, त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. ४ जूननंतर काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा छातीठोकपणे अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसोबत या. मोठ्या अभिमानाने स्वप्ने साकार होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.