Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राजधानी मुंबईत सत्ताधारी आणि विरोधकांच्या एकाच दिवशी सभा झाल्या. एकीकडे मुंबईच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची सभा पार पडली, तर दुसरीकडे बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेतून शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी पवारांनी मोदींच्या भटकता आत्मा टीकेलाही प्रत्युत्तर दिले.
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका
शरद पवार म्हणतात, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी संकटाच्या काळात तुम्हाला वाचवंल, तुम्ही त्यांनाच विसरला. तुम्ही कितीही टीका करा, पण मराठी माणूस उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभा आहे. बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला विचार उद्धव ठाकरे पुढे घेऊन जात आहे, त्यामागे राज्यातील सामान्य माणूस उभा आहे. तुम्ही माझ्यावर टीका केली, महाराष्ट्रात कुणीतरी भटकता आत्मा असल्याचे बोलला. एवढंच सांगतो की, हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. त्यासाठी जे करावं लागेल, ते करण्याची तयारी आहे, असा इशारा पवारांनी मोदींना दिला.
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
पवार पुढे म्हणाले, आज देशाचे संविधान वाचवण्याची गरज आहे. जे सोबत नाही, त्यांना तुरुंगात टाकले जात आहे. केजरीवालांनी दिल्लीत चांगले काम केले. शाळा, आरोग्य सुविधा दिल्या आणि दिल्लीचा चेहरा बदलला. पण मोदींनी त्यांना तुरुंगात टाकले. अनेक राज्याच्या नेत्यांनाही तुरुंगात टाकले. मी म्हणेल तीच पूर्व दिशा, मी म्हणजेच लोकशाही, असे सुरू आहे. हे असंच सुरू राहिल्यास तुमचे आणि माझे अधिकार उद्ध्वस्त केल्याशिवाय मोदी स्वस्थ बसणार नाही, अशी घणाघाती टीकाही पवारांनी केली.