लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वात महायुतीचेच सरकार येणार, असा विश्वास व्यक्त करून २०२९ मध्ये मात्र भाजप राज्यात स्वबळावर सत्तेत येईल, असे भाकीत केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी मंगळवारी वर्तविले.
मुंबईतील भाजपचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी यांच्या बैठकीत शाह यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, माजी मंत्री रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार व्यासपीठावर उपस्थित होते.
निवडणुकीसाठी सर्वांचे नीतिधैर्य वाढविणारे भाषण शाह यांनी यावेळी दिले. ते म्हणाले की, लोकसभा निवडणूक आपण तिसऱ्यांदा जिंकली. काँग्रेस शंभरीही गाठू शकली नाही, मग तरीही तुम्ही निराश का राहता? नैराश्य गाडून टाका. महाराष्ट्राची निवडणूक देशाची दशा आणि दिशा बदलेल. मला दिल्लीत विचारतात की महाराष्ट्रात काय होणार? मी आताही सांगतो, आपलीच सत्ता येणार आहे. ही काळ्या दगडावरची रेष आहे. आता आपल्याला महायुतीचेच सरकार आणायचे आहे, २०२९ मध्ये शुद्धपणे कमळाचे सरकार असेल. महाराष्ट्राचे प्रश्न सोडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत असे म्हणत त्यांनी नेतृत्व त्यांचेच असेल, असे स्पष्ट संकेत दिले.
मतभेद नको; मुंबईच्या नेत्यांची कानउघाडणीशाह यांनी मुंबईतील पक्षांतर्गत लहानमोठे वाद तातडीने मिटवा, एकत्र बसा असा आदेश दिला. आज मी जे सांगतो आहे ते लिहून घ्या आणि त्यानुसार वागा असा सल्लाही त्यांनी दिला. मुंबई भाजपमधील गटबाजीचा थेट उल्लेख न करता त्यांनी कानउघाडणी केली. नगरसेवक, आमदार, खासदारांबद्दल तसेच सरकारबद्दल कुठे नाराजी असेल तर ती आधी दूर करा, असे ते म्हणाले.
राज्यात ‘व्होट जिहाद’ : देवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरे यांना मराठी व हिंदूंचा जनाधार राहिलेला नाही, त्यांच्या रॅलीमध्ये हिरवे झेंडे नाचतात अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. लाेकसभेत ‘व्होट जिहाद’ पाहायला मिळाला होता, अशी टीका केली. लव्ह जिहादच्या राज्यात एक लाख तक्रारी आहेत. धुळ्याचे उदाहरण देऊन लोकसभा निवडणुकीत १४ मतदारसंघांमध्ये वोट जिहाद घडले, असे फडणवीस म्हणाले.
साम, दाम, दंड, भेद वापरा, पण मतदान वाढवा नवी मुंबई : महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा ठरविणार आहे. येथे जे जिंकणार ते देशावर १५ वर्षे राज्य करणार आहेत. यामुळे आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे. प्रत्येक बूथवर साम, दाम, दंड, भेद अवलंबून १० टक्के मतदान वाढलेच पाहिजे, असे अमित शाह यांनी मंगळवारी पक्षाच्या कोकण विभागीय कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले.