राष्ट्रवादी पक्ष फुटला आणि त्याचे पडसाद पवार कुटुंबातील कौटुंबिक कार्यक्रमांवरही दिसू लागले आहेत. दरवर्षी सकाळी पवार कुटुंबात होणारा रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला नसल्याचे रोहित पवार यांनी म्हटले होते. अजित पवारांनी राष्ट्रवादीत वेगळी चूल मांडल्याने कुटुंबासोबतही अंतर वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. अशातच सुप्रिया सुळे यांनी रात्री उशिरा रक्षाबंधनाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
दरवर्षी सकाळी सकाळी होणारा राखी बांधण्याचा पवार कुटुंबातील कार्यक्रमच झाला नसल्याचे शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी सांगितले होते. सकाळी कुठेनाकुठेतरी आमच्या आधीच्या पीढीच्या बाबतीतला नेहमी, दरवर्षी राखी बांधण्याचा कार्यक्रम होत होता, तो झाला असता आम्हाला आनंद वाटला असता, असे रोहित पवारांनी म्हटले आहे. याचबरोबर रोहित पवारांनी आशावादी असल्याचेही म्हटले होते.
परंतू, सायंकाळ झाली तरी अजित पवार काही रक्षाबंधनाला सुळेंकडे गेले नाहीत. अखेर सुप्रिया सुळे यांनी सायंकाळी उशिरा ट्विटरव रक्षाबंधनाचा व्हिडीओ शेअर केला आहे. दरवर्षीप्रमाणे श्रीनिवासबापू पवार यांना राखी बांधल्याचे सुळेंनी म्हटले आहे. शिवाय व्हिडीओमध्ये हे अतूट स्नेहबंध! असे म्हटले आहे.
राजकीय दरीचे पडसाद अन्य राजकीय नेत्यांच्या घरीही दिसून आले आहेत. धनंजय मुंडेंना पंकजा मुंडे यांनी राखी बांधली नाही. मुंडेंना आदिती तटकरे यांनी राखी बांधली. पंकजा यांनी महादेव जानकरांना राखी बांधली. शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटलांनी वैशाली सुर्यवंशी यांच्या घरी न जात, वैशाली यांनी आयोजित केलेल्या सार्वजनिक कार्यक्रमात जात राखी बांधून घेतली.