मुंबई : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने २०२३-२४ हे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार आहे. या वर्षात शाळांना सुमारे ७६ दिवस सुट्टी मिळणार आहे. यात विविध सण व उत्सवाच्या तब्बल २७ दिवसांच्या सुट्ट्यांचा समावेश आहे.
शाळांचे कामकाज २३८ दिवस सुरू राहणार आहे. प्रथम सत्र हे १५ जून २०२३ ते ७ नोव्हेंबर २०२३ असे असेल. त्यानंतर ८ ते २१ नोव्हेंबर २०२३ पर्यंत १० दिवसांची दिवाळी सुट्टी असेल. द्वितीय सत्र २२ नोव्हेंबर २०२३ ते १ मे २०२४ पर्यंत असेल. उन्हाळी सुट्टी २ मे ते १४ जून २०२४ अशी ३७ दिवस मिळणार आहे. शाळांना उन्हाळ्याची व दिवाळीची सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अथवा नाताळ या सणांना शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीने सुट्टीचे समायोजन करता येणार आहे. मुख्याध्यापकांच्या अखत्यारितील दोन स्थानिक सुट्ट्या निश्चित करून त्या शिक्षणाधिकाऱ्यांना कळवाव्या लागणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यासाठी निश्चित केलेल्या स्थानिक सुट्ट्या व शासन स्तरावरून जाहीर झालेल्या सार्वजनिक सुट्ट्या शाळांनी घेणे बंधनकारक असणार आहे.
या सुट्ट्या गेल्या वाया...यंदाच्या शैक्षणिक वर्षात चार सार्वजनिक सुट्ट्या रविवारीच आल्या आहेत. यात १५ ऑक्टोबर- घटस्थापना, १२ नोव्हेंबर - लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, १४ एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, २१ एप्रिल - महावीर जयंती यांचा समावेश आहे. त्यामुळे शाळांच्या या चार सार्वजनिक सुट्ट्या कमी झाल्या आहेत.