दीपक भातुसे
मुंबई - महसूल विभागातील अधिकाऱ्यांना नवीन कायदे आणि सरकारी धोरणांबाबत प्रशिक्षण देण्यासाठी दरवर्षी होणारी महसूल परिषद यशदामध्ये न घेता यंदा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील मेडिकल कॉलेजमध्ये घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे अधिकारी आश्चर्य व्यक्त करत आहेत.
शासनाकडून दिले जाणारे प्रशिक्षण कार्यक्रम हे पुण्यातील यशदा या संस्थेत होत असतात. आतापर्यंत महसूल परिषदेचे आयोजनही याच यशदामध्ये केले जात होते. तिथे प्रशिक्षणासाठीच्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध असून प्रशिक्षणासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निवासाची कायमस्वरुपी व्यवस्थाही आहे. असे असताना यावेळी हा प्रघात मोडून यशदाऐवजी नगर जिल्ह्यातील लोणी येथील प्रवरा इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या महसूल मंत्र्यांशी संबंधित खाजगी संस्थेत महसूल परिषदेचे आयोजन करून सरकारच्या पैशांची उधळपट्टी का केली जात आहे, असा प्रश्न मंत्रालयातील अधिकारी खाजगीत विचारत आहेत.
येत्या २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी दोन दिवस ही परिषद होत असून या परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तर समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणार आहे. महसूल विभागच या परिषदेचा आयोजक असून स्वतः महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दोन्ही दिवस या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय महसूल विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांपासून ते सर्व महसूल विभागाचे आयुक्त, राज्यातील ३६ जिल्हाधिकारी, ३६ अप्पर जिल्हाधिकारी, जमाबंदी आयुक्त, नोंदणी महानिरीक्षक, मंत्रालयातील महसूल विभागाचे सर्व उपसचिव तसेच काही विभागांचे अप्पर मुख्य सचिव आणि प्रधान सचिव असे जवळपास महाराष्ट्रभरातून शंभरहून जास्त अधिकारी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय नगर आणि नाशिक जिल्ह्यातील महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी मदतीला बोलवण्यात आले आहेत.
तसेच अधिकाऱ्यांचे वाहन चालक, सहाय्यक असे मिळून जवळपास दोनशे ते अडीचशे जण या परिषदेसाठी लोणीमध्ये असतील. महाराष्ट्रभरातील या अधिकाऱ्यांना प्रवासाच्या दृष्टीने पुणे हे ठिकाण सोयीचे असून लोणी हे प्रवासाच्या दृष्टीने अडचणीचे ठरणार असल्याचे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यशदामध्ये प्रशिक्षण घेण्याचा हा प्रघात मोडल्यामुळे भविष्यातही प्रत्येक मंत्री सरकारच्या खर्चातून आपल्या संस्थेत कार्यक्रम घेईल, अशी भीतीही काही अधिकारी बोलून दाखवत आहेत.
परिषद लोणीला, निवास शिर्डीच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये
लोणीला ही परिषद होणार असली तरी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची राहण्याची व्यवस्था शिर्डी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. येथील तहसीलदार आणि प्रांतांकडे निवासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र हा खर्च कोण करणार याबाबत संभ्रम आहे. लोणी येथील प्रशिक्षण ठिकाणापासून शिर्डीतील हे हॉटेल ३० किलोमीटर लांब आहे. त्यामुळे हा दररोजचा प्रवास अधिकाऱ्यांना करावा लागणार आहे.