कोकणात चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना दिलासा, अजित पवारांनी केल्या मोठ्या घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 04:45 PM2020-06-10T16:45:58+5:302020-06-10T16:56:12+5:30
कोकणवासीयांना मदत म्हणून प्रतिकुटुंब कपड्यांसाठी आणि भांड्यांसाठी 5 हजार रुपये देणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे.
मुंबईः कोरोनानं राज्यात थैमान घातलेलं असून, रुग्णसंख्याही वाढत चालली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी निसर्ग चक्रीवादळानंही कोकणाला तडाखा दिला होता. या वादळानं कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावरच्या भागातील रहिवाशांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कोकणवासीयांना मदत म्हणून प्रतिकुटुंब कपड्यांसाठी आणि भांड्यांसाठी 5 हजार रुपये देणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे.
नष्ट झालेल्या झोपड्यांसाठी १५ हजार रुपये दिले जाणार आहेत, तसेच प्रतिकुटुंब ५ हजार कपड्यांसाठी आणि प्रतिकुटुंब ५ हजार भांड्यांसाठी देणार असल्याचं जाहीर केलं आहे. आंबा, नारळ, फणस यांची झाडं नष्ट झाली आहेत, त्यासाठी हेक्टरी ५० हजार रुपये देण्यात असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं. प्रतिकुटुंब पाच लीटर रॉकेल, भिजलेले धान्य बदलून देणार असल्याचंही अजितदादांनी म्हटलं आहे.
कोरोनामुळे कापूस खरेदी होत नव्हती, पावसाचे संकट आहे, त्यामुळे तातडीने ती खरेदी व्हावी, अशी भूमिका पालकमंत्र्यांनी मांडली, त्यानुसार CCIच्या सर्व कापूस खरेदी करण्याची तयारी दर्शवल्याची माहिती त्यांनी दिली. कोल्हापूर, सांगली, सातारा पूरग्रस्तांचे काही पैसे राहिले होते, ते पैसे तातडीने देण्यात येणार आहे, कोल्हापुरातील पैसे उद्याच दिले जातील. यापुढे वादळाचा तडाखा बसू नये म्हणून पक्क घरं देण्यात येणार जाहीर केलं.