मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील नवेगाव पाथरी वनक्षेत्रातील वाघाच्या चार बछड्यांचा झालेला मृत्यू हा भुकेमुळे आणि तीव्र थंडीमुळे झाल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे संदीप बाजोरिया यांनी प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर मुनगंटीवार म्हणाले की, या बछड्यांचा मृत्यू थंडी आणि भुकेमुळे झाला. मात्र मृत्यूची अन्य काही कारणे असू शकतात का, याचा तपास चालू आहे. या बछड्यांच्या मातेचाही शोध सुरू असल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले. वाघिणीची शिकार झाली का? अशी शंका सदस्यांनी उपस्थित केली. मात्र, वाघिणीची शिकार झाल्याच्या निष्कर्षापर्यंत अजून वनविभाग पोहचलेला नाही. वनविभागातर्फे शिकारीवर नियंत्रण करण्यासाठी पेंच, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी विशेष व्याघ्र संरक्षण दलाची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष व्याघ्र संरक्षण दलामार्फत कोअर व बफर क्षेत्राच्या संवेदनशील भागात नियमित गस्त घातली जात आहे. महत्त्वाच्या ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील बिनतारी संदेश यंत्रणा २४ तास कार्यरत असून कॅमेरा ट्रॅप लावून वाघ, बिबट्यांवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
‘त्या’ बछड्यांचा थंडीमुळे मृत्यू
By admin | Published: April 02, 2016 1:24 AM