नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीच्या खर्चाचा तपशील देण्यास नकार देणाऱ्या जिल्ह्यातील १,०६८ उमेदवारांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरविण्याचा मार्ग मोकळा झाला असून, प्रशासनाच्या नोटिसीनंतर खर्च सादर करणाऱ्या ८९० उमेदवारांचे म्हणणे जाणून घेतल्यानंतर त्यांच्याविषयी निर्णय घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनाही लोकप्रतिनिधी कायद्यान्वये निवडणूक खर्चावर बंधने लादण्यात आली असून, प्रचार व प्रसारावरील खर्चाचा तपशील निवडणूक काळात दर दोन दिवसांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे लेखी स्वरूपात सादर करणे बंधनकारक आहे, तर निवडणूक संपल्यानंतर महिनाभरात संपूर्ण खर्चाचा तपशील देणे सक्तीचे असते. खर्च सादर न करणाऱ्यांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याची कायद्यात तरतूद आहे. जिल्ह्यात एप्रिलमध्ये ५९२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या, त्यात १,९५८ उमेदवारांनी खर्च सादर न केल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने त्यांना नोटिसा बजावून खुलासा मागविण्यात आला, परंतु त्यातील १,०६८ उमेदवारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांना सहा वर्षांसाठी सर्व प्रकारच्या निवडणुका लढविण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यातील प्रत्येकाला अपात्र ठरविण्यासाठी स्वतंत्रपणे नोटीस देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)
खर्चाचा तपशील न देणारे ते उमेदवार अपात्र
By admin | Published: June 26, 2016 2:57 AM