विश्वास पाटील, कोल्हापूरवेश्यांची मुले चोरी, गुन्हेगारीसारख्या विळख्यात अडकू नये नयेत आणि त्यांचे भवितव्य लखलखीत व्हावे यासाठी येथील वारांगना सखी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. गरोदर असल्यापासूनच देहविक्रय करणाऱ्या महिलांचे प्रबोधन करून ही मुले चांगल्या स्वयंसेवी संस्थांमार्फत समाजाच्या मुख्य प्रवाहात यावीत, असे प्रयत्न सुरू केले आहेत.कोल्हापुरात शरीरविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांचे संस्थेकडे अधिकृत नोंदणी झाली आहे. यातील बहुतांश विवाहित आहेत. कौटुंबिक वादातून कुठेच आधार न मिळाल्यास त्या नाइलाजाने या व्यवसायात येतात. भाड्याने खोली घेऊन राहतात. पुरुषांसमवेतच्या संबंधातून जन्माला येणारी मुले सांभाळण्याची जबाबदारी त्या महिलांवरच असते.ही मुले आईसोबतच ‘वेश्येची मुले’ हा शिक्का घेऊन वाढतात व पुन्हा गुन्हेगारीच्या चक्रात येतात. मुली असतील तर त्या पुन्हा याच व्यवसायात येतात. हे चक्र भेदायचे असेल तर मुलांना आईपासून लहानपणीच तोडले पाहिजे, असा विचार करून या संघटनेने पाऊल टाकले आहे.वेश्या गरोदर असल्यापासूनच संघटना त्यांची देखभाल करीत आहे. एखाद्या महिलेस मूल झाल्यावर कोल्हापुरातील स्वयंसेवी संस्थांमध्ये दाखल करून तिथून त्याचे चांगल्या कुटुंबात दत्तक प्रक्रियेमार्फत कसे पुनर्वसन करता येईल, याच्या प्रयत्नात संघटना असते. वेश्यानां अडचणीच्या काळात संस्था मदत करत असल्याने हा विषय चर्चेत आला.चाळीस-बेचाळीस वयानंतर वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेला रोज पोट भरण्याएवढेही पैसे मिळत नाहीत. अशावेळी पदरी असलेल्या मुलांच्या संगोपनाचे काय करायचे हा मोठा प्रश्न असतो. या मुलांचे आयुष्य चुरगळले जाऊ नये यासाठीच आम्ही संघटनेच्या माध्यमातून या महिलांमध्ये प्रबोधन करून मुलांना दत्तक देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.- शारदा यादव, अध्यक्षा, वारांगना सखी संघटना, कोल्हापूर
‘त्या’ मुलांसाठी ‘वारांगना सखी’चा वसा
By admin | Published: June 09, 2015 2:50 AM