ऑनलाइन लोकमतसांगली, दि. 07 - कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा अमानुषपणे खून करणाऱ्या आरोपींवर तातडीने आरोपपत्र दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, आरोपींच्या सर्व चाचण्या व अहवाल येण्यास वेळ लागला. त्यामुळे आरोपींवर आरोपपत्र दाखल होण्यास उशीर झाला असला तरी सरकार याबाबत गंभीर आहे. या प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा होऊ शकते, असा विश्वास शिवसेनेच्या नेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी सांगलीत व्यक्त केला.विधानपरिषद विशेषाधिकार समितीच्या बैठकीच्या निमित्ताने आ. गोऱ्हे सांगली दौऱ्यावर होत्या. या समितीच्या कामकाजाची माहिती त्या पत्रकारांना देत असतानाच कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर दोषारोपपत्र दाखल झाल्याचे वृत्त धडकल्याने त्यांनी यावर भूमिका स्पष्ट केली.गोऱ्हे म्हणाल्या की, पोलिस महासंचालकांच्या अहवालानुसार पंधरा दिवसात आरोपींवर दोषारोप दाखल होणे अपेक्षित होते मात्र, डीएनए चाचणीसह अन्य अहवाल येण्यास उशीर झाल्याने दोषारोपपत्रास विलंब झाला असला तरी सरकार या घटनेबाबत गंभीर असल्याने आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. या खटल्याचे विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आहे.राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत त्या म्हणाल्या की, विद्यमान सरकारच्या कालावधीत गुन्ह्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी केवळ सहा टक्क्यांवर असलेले हे प्रमाण आता ३० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. सांगली आणि मुंबईमध्ये तर शिक्षेचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने कायद्याचे राज्य स्थापित करण्यात सरकार यशस्वी झाले आहे.शिवसेना भेकड नाहीदसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी मराठा समाजाची माफी मागून मराठा समाजाचा राग कमी करण्याचा प्रयत्न केला, हा विरोधकांचा आरोप चुकीचा असून उलट ठाकरे यांनी ददिलगिरी व्यक्त केल्याने जनतेसमोर आपण नम्र आहोत, हेच दिसून आले आहे. विरोधकांच्या आरोपांमुळे दसरा मेळाव्याला बाधा पोहचणार नसून असे हजारो मेळावे शिवसेना घेतच राहील. विरोधकांच्या आरोपांना घाबरण्याएवढी शिवसेना भेकड नाही, असे आ. गोऱ्हे म्हणाल्या.
कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा होऊ शकते - नीलम गोऱ्हे
By admin | Published: October 07, 2016 7:38 PM