खुलताबाद (जि. औरंगाबाद) : भारतीय जैन संघटना व पाणी फाउंडेशन यांच्यावतीने देशाला दिशा देणारा उपक्रम राबविण्यात येत असून श्रमदानातून ४५ दिवसांत तालुक्यातील गोळेगाव दुष्काळमुक्त होणार आहे. रविवारी महावीर जयंतीच्या दिवशी याचा शुभारंभ करण्यात आला. येथील डोंगर परिसरात ग्रामस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी, श्रमदान करण्यासाठी रविवारी पहाटे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची ६५० मुले- मुली दाखल झाले. त्यांनी पहाटेपासून पाणी अडवा, पाणी जिरवाची तसेच पाणलोटची कामे केली.अभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनने ‘वॉटर कप’ स्पर्धा ठेवली आहे. या स्पर्धेत राज्यातील ३० तालुक्यांना सहभागी करण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्यातील ३७ गावांचा तर फुलंब्री तालुक्यातील ५४ गावांचा यात समावेश आहे. याअंतर्गत वाहून जाणारे पाणी अडवून गावातील पाणीपातळी वाढविण्यात येणार आहे. ही सर्व कामे श्रमदानातून करायची असून श्रमदान झाल्यानंतर भारतीय जैन संघटना मशिनरी पुरविणार आहे. संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा, गौतम संचेती, प्रफुल्ल पारख, आ. प्रशांत बंब, विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड, डॉ. विजयकुमार फड, कृषी अधीक्षक पडवळ, सुरेश बेदमुथा, सत्यमेव जयतेचे संचालक सत्यमेव भटकर आदींनी येथे भेट देऊन झालेल्या कामाचे कौतुक केले. (प्रतिनिधी)२३ तारखेला औसा तालुक्यात श्रमदानशांतीलाल मुथा म्हणाले की, देशात व राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे कुठे नुकसान किंवा हानी झाली तेथे जैन संघटना २४ तासांत पोहोचून मदत करते. जैन संघटनेने मेळघाट व ठाण्यातील आदिवासी मुलांना शिक्षण देऊन प्रवाहात आणले. गोळेगावप्रमाणेच २३ तारखेला लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात श्रमदानाचे काम सुरू होणार आहे.
‘त्या’ शेतकऱ्यांच्या पाल्यांचे श्रमदान
By admin | Published: April 10, 2017 3:33 AM