पिंपरी : चेन्नई येथून पोर्ट ब्लेअरला जाताना बेपत्ता झालेल्या एएन-३२ विमानातील २९ प्रवाशांमध्ये पिंपरी चिंचवडचे फ्लाइट लेफ्टनंट कुणाल बारपट्टे यांचाही समावेश आहे. ते विमानात नेव्हिगेटर म्हणून कार्यरत आहेत. तीन दिवसांपासून विमानाचा शोध सुरू आहे. कुणाल हे निगडी, प्राधिकरणातील सिंधुनगर एलआयजी कॉलनीत राहतात. त्यांचे वडील राजेंद्र व आई विद्या बारपट्टे यांना शुक्रवारी विमान बेपत्ता झाल्याची बातमी समजताच मोठा धक्का बसला, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. कुणाल हे २००८ मध्ये हवाई दलात रूजू झाले. त्यांचा लहान भाऊ सत्येंद्र आॅस्टे्रलियात उच्चशिक्षण घेत आहे. बेपत्ता विमानाचा रविवारीही शोध न लागल्याने बारपट्टे कुटुंबीयांची अस्वस्थता वाढली आहे. कुणाल यांचे मामा दिनेश पाटील हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या टिष्ट्वटवर पाटील यांनी री-टिष्ट्वट करून कुणालविषयी विचारणा केली. त्यानंतर, हवाई दलाचे अधिकारी बारपट्टे परिवाराच्या संपर्कात आहेत. दिनेश पाटील यांनी खा. श्रीरंग बारणे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनीही संरक्षणमंत्र्यांशी संपर्क साधून माहिती घेतली. (प्रतिनिधी)चेन्नई/विशाखापटणम : हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी विमान बेपत्ता झाल्याची औपचारिक तक्रार पोलिसांकडे नोंदविली आहे. विमानाच्या शोधासाठी उपग्रहाची मदत घेणार आहे, असे वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले. नौदल, किनारा रक्षक दलाच्या १८ बोटी व पाणबुडी, तसेच आठ विमाने २४ तास बेपत्ता विमानाचा शोध घेत आहेत. २२ जुलैला स. ८.३० वा. चेन्नईजवळच्या तंबारम हवाई तळावरून हे विमान पोर्ट ब्लेअरला झेपावले. त्यानंतर, १६ मिनिटांनी त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता.
‘त्या’ बेपत्ता विमानाचा ‘नेव्हिगेटर’ मराठी तरुण
By admin | Published: July 25, 2016 5:24 AM