मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ११ जुलैपर्यंत बंडखोर आमदारांना मुदत दिली आहे. न्यायालयाबद्दल आम्हांला आदर आहे; पण महाराष्ट्राची जनता या बंडखोर आमदारांना माफ करणार नाही. या मुदतीनंतर आमदारांचे निलंबन होणारच, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. न्यायालयाच्या निकालामुळे मिळालेल्या वेळेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू, असे सांगून संजय राऊत म्हणाले की, जे काही बंडखोर आमदार वागले आहेत, ते योग्य नाही. कायद्याच्या मंदिरात गेल्यानंतर तारीख पे तारीख चालत राहील. हे आमदार जेव्हा मुंबईत येतील, तेव्हा त्यांच्यासोबत नीट बोलणे करता येईल. निलंबन त्यांनी तूर्तास टाळले आहे; मात्र ते होणारच. त्यात बदल होणार नाही. स्वत:ला शिवसेनेचे वाघ म्हणवतात; मग त्यांना मुंबईत यायला भीती का वाटते? असाही प्रश्न राऊत यांनी केला. तसेच, ४० बॉड्यांच्या विधानाचा विपर्यास केल्याचेही राऊत म्हणाले. ‘ज्यांचा आत्मा मेला आहे, अशा लोकांची शरीरे या ठिकाणी येतील,’ असे मी म्हटले होते. त्याचा विपर्यास केला गेला. ईडीच्या नोटिसीबाबत विचारले असता, ‘हा तपास यंत्रणांचा गैरवापरच आहे. मी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही, तरीही नोटीस दिली जाते आहे. याबाबत कोण सूचना देत आहे, याची मला कल्पना आहे. या लोकांना विरोधकच संपवायचे आहेत. जे काही चाललंय ते चुकीचं आहे,’ असे राऊत म्हणाले.
Maharashtra Political Crisis : ...तरीही ‘त्या’ आमदारांचे निलंबन होणारच - राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 10:46 AM