ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - गोव्याचा प्रवास तोही 100 रुपयांत ऐकून अचंबित झालात ना ! मात्र, तीन मुलींनी हा प्रवास सहजशक्य करून दाखवला आहे. इशिका राय, हिना वासनानी आणि सुकन्या शर्मा यांनी नऊ दिवसांत रस्ते प्रवास करत गोवा गाठलं आहे. विशेष म्हणजे प्रत्येक दिवसाला फक्त 100 रुपये खर्च करण्याचं या तिघींनी नियोजन केलं होतं. गेल्या काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या दिल चाहता है या सिनेमापासून प्रेरणा घेऊन या तिघींनी हा प्रवास केल्याची चर्चा आहे. दरम्यान, 23 वर्षांची सुकन्या शर्मा ही मुक्त लेखिका असून, स्कूबा ड्रायव्हर आहे. ती मूळची आग्र्याची असून, मुंबईला जाण्यापूर्वी ती पुणे आणि जयपूरला वास्तव्याला होती. तर 29 वर्षीय हिना वासनानी ही उदयपूरची असून, ती 2010ला ती मुंबईत आली. ती लहान चित्रपट निर्माती आहे. तसेच तिला साहसी क्रीडा प्रकार आवडतात. 35 वर्षीय इशिका राय ही कोलकात्याहून आली असून, पुण्यातल्या मायो कॉलेजमधून तिने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ती सध्या आर्किटेक्ट आहे. इशिकानं यापूर्वी दिल्लीचा रस्ते प्रवास केल्याची माहिती दिली आहे. तीन वर्षांपूर्वी मी 14 रस्त्यांवरून प्रवास केले आहेत. मला रस्ते प्रवास खूप आवडत असल्याचंही तिने सांगितलं आहे. रस्ते प्रवासात शेवटच्या मिनिटाला आमचा कार्यक्रम बदलत असे. आम्हाला कोणतेच नियम पाळावे लागले नव्हते. हिनामुळेच सुकन्या आणि इशिकाची ओळख झाली होती. सुकन्या म्हणाली, मी मुक्त लेखिका असल्यानं मला बाहेर फिरण्याची संधी मिळत होती. हिना आणि मी ब-याच ठिकाणी फिरलो. त्यानंतर हिनाच्या डोक्यातून या रस्ते प्रवासाची कल्पना आली. या प्रवासासाठी घरच्यांचाही विरोध होता. रस्ते प्रवास करणं ही आमची आवड आहे, असं हीनानं सांगितलं आहे. तर प्रवासात आम्हाला जास्तच मोकळेपणाने वेगवेगळ्या लोकांना भेटता आले. आम्हाला कमी खर्चात हा प्रवास करणं साधता आल्याचंही इशिकानं सांगितलं. आमचा बजेट प्रतिदिन 500 ते 1000 रुपयांपर्यंत वाढवण्याचाही काही मैत्रिणींनी सल्ला दिला, मात्र आम्ही कमी बजेटमध्येच प्रवास करण्याचा निश्चय केला होता, असं हिना म्हणाली.
दरम्यान, सुकन्या म्हणाली, प्रवासादरम्यान जास्त भार होऊ नये म्हणून आम्ही फारच थोडे कपडे सोबत घेतले होते. एकदा आम्ही कारनं जाण्याचाही निर्णय घेतला, मात्र त्यानंतर चालत जाण्यावर आमचं एकमत झालं. तसेच आम्ही पहिला थांबा अलिबागला घेतला. त्यानंतर मुरुड जंजिरा, हरिहरेश्वर, दापोली, गुहागर, रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ला आणि नंतर गोव्यात दाखल झालो. त्यानंतर गोव्याला पोहोचल्यावर आम्ही दोन दिवस आराम केला, असं हीनानं सांगितलं आहे.