मुंबई - शपथविधी झाल्यानंतर त्याच दिवशी खाते वाटप होतात, असा आतापर्यंतचा प्रघात आहे. मात्र अद्यापही सत्तेत आलेल्या नव्या सहकाऱ्यांचा खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे नव्या सहकाऱ्यांसोबत सत्ताधाऱ्यांचे अद्याप एकमत नाही असे दिसते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.
राज्यात अभूतपूर्व राजकीय नाट्यानंतर अद्यापही राज्याचा प्रशासकीय कारभार सुरळीतपणे सुरू झालेला नाही. या पार्श्वभूमीवर बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, नुकत्याच झालेल्या शपथविधीनंतर राज्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने नवे सहकारी घेतले मात्र शपथविधीनंतर अद्यापही खातेवाटप झालेला नाही. अनेक जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्याने प्रशासन ठप्प झाले आहे. या परिस्थितीकडे लक्ष देऊन सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा व राज्याचा कारभार सुरू करावा.
नव्या आलेल्या सहकाऱ्यांमुळे सत्ताधारी पक्षातील अनेक आमदार व अपक्ष आमदार नाराज असल्याचा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, कोणाचं काय ठरले आहे हे माहिती नाही. जे नाराज असतील त्यांनी पुढे येऊन आपली भूमिका व्यक्त करावी. अन्याय होत असेल तर त्यांनी तो जनतेसमोर मांडावा. दरम्यान, संख्याबळ पाहता काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्षनेता होणे शक्य आहे. लवकरच आम्ही त्याबाबतही आमच्या सहकारी पक्षासोबत चर्चा करू व निर्णय घेऊ अशी माहिती त्यांनी दिली.