मुंबई : मुंबईच्या वरळी भागात गेल्या रविवारी हिट अँड रनची घटना घडली होती. याप्रकरणी मुख्य आरोपी मिहीर शाहाला न्यायालयाने १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. याबाबत भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या प्रकरणामध्ये कुणीही असो, कायद्यासमोर सर्व सारखेच आहेत. कायद्यासमोर कोणीही लहान किंवा मोठा नाही. हिट अँड रनमध्ये जे दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी कोस्टल रोडची पाहणी केली. यावेळी वरळी हिट अँड रन प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, या प्रकरणामध्ये मी पहिल्या दिवसापासून सूचना दिल्या आहेत. मी पोलीस आयुक्तांनाही सांगितले की, यामध्ये कुणीही असो, कायद्यासमोर सर्व सारखेच आहेत. कायद्यासमोर कोणीही लहान किंवा मोठा नाही. हिट अँड रनमध्ये जे दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तसेच, बार, पब्जमध्ये ड्रग्जसारखे अनैतिक व्यवहार करणाऱ्यावंरही कठोर कारवाई करण्याचे आदेश मी दिले आहेत.
मिहीर शाह हा शिवसेनेच्या शिंदे गटातील उपनेते राजेश शाह यांचा मुलगा आहे. त्यामुळे वरळी हिट अँड रन प्रकरणावरून विरोधकांकडून शिंदे गटावर टीका करण्यात आली. यानंतर आज शिवसेना शिंदे गटाने उपनेते राजेश शाह यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. याबाबतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न करण्यात आला. यावेळी राजेश शाह यांच्यावर पक्षीय कारवाई करण्यास ४ दिवस का लागले? असे विचारले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जे गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत पहिले प्राधान्य दिले पाहिजे. याला प्रधान्य द्यायचे की राजकारण करायचे? असा सवाल त्यांनी केला.
वाहतुकीच्या समस्येतून मोठा दिलासा मिळणार - मुख्यमंत्रीवरळी सी-लिंकला जोडणारा रस्ता २ ते ३ आठवड्यांमध्ये पूर्ण होणार आहे. कोस्टल रोड सी-लिंकला जोडला गेल्याने वाहतुकीच्या समस्येतून मोठा दिलासा मिळणार आहे. एक-एक टप्पा पूर्ण झाल्यानंतर तो उदघाटनासाठी न थांबवता लोकांसाठी खुला करत असून यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिली. तसेच, विरोधकांनी केलेल्या टीकेवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "विरोधक नेहमीच आरोप करत असतात. त्यांच्याकडे आरोप करण्यापलीकडे दुसरं काही काम नाही. आम्ही सकारात्मक पद्धतीने काम करत आहोत. मुंबईमध्ये किती मोठे प्रकल्प सुरु आहेत, ते जनता बघत आहे. मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू, कारशेड असेल, हे सर्व प्रकल्प आम्ही करत आहोत. विरोधकांना ते दिसणार नाहीत."