दीनानाथ परब, ऑनलाइन लोकमत
भारत चंद्राच्या पुढे मंगळावर जाऊन पोहोचला असला तरी, देशात आजही अशी अनेक घरे आहेत जिथे मुलीचा जन्म नको असतो. लग्नानंतर पहिला मुलगा जन्माला यावा अशी कित्येक कुटुंबांची इच्छा असते. मुलीच्या जन्माने कुटुंबाचा वंश कसा वाढणार या भावनेतून आजही मुलींना नाकारले जाते. अशी विचारसरणी, मानसिकता ठेवणा-या सर्वांसाठी रिओ ऑलिम्पिकमधील सिंधू, साक्षीची पदकविजेती कामगिरी सणसणीत चपराक आहे.
सिंधू, साक्षी, ललिता, दीपाची रिओ ऑलिम्पिकमधील कामगिरी असामान्य आहे. कारण त्यांनी सर्वोत्तम खेळाडूंना नमवलेच पण त्याचबरोबर प्रतिकुल परिस्थितीशी झगडा देत ऑलिम्पिकमध्ये इथपर्यंत मजल मारली. स्त्रियांच्या मार्गात पुरुष अडथळे आणतात असे या लेखातून सुचवण्याचा अजिबात हेतू नाही. पूर्वीच्या तुलनेत समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन निश्चित बदलला आहे.
पण तो अजून पूर्णपणे बदलेला नाही हा मुद्दा आहे. कारण तो पूर्णपणे बदलला असता तर, लपून-छपून स्त्रीभ्रूण हत्या झाल्या नसत्या. पहिली मुलगी झाली म्हणून पुन्हा मुलासाठी चान्स घेतला गेला नसता. म्हणून सिंधू, साक्षीच्या यशाकडे केवळ खेळाच्या नजरेतून न बघता सामजिक दृष्टीने बघणे आवश्यक आहे. कल्पना करा, १३० कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भारताला ऑलिम्पिकमध्ये एकही पदक मिळाले नसते तर, देशाची काय लाज राहिली असती ?.
कास्यंपदक मिळवणा-या साक्षी मलिकने रोहतकच्या ज्या प्रशिक्षण केंद्रात कुस्तीचे धडे गिरवले तिथे सुरुवातीला महिलांच्या प्रवेशाला विरोध झाला होता. प्रशिक्षक आणि सह खेळाडूंनी हा विरोध मोडून काढला. जर त्यावेळी हा विरोध मोडला नसता तर, देशाला आज कास्यंपदक मिळाले असते का ?. ऑलिम्पिकमधली भारताची कामगिरी निश्चित आशादायक किंवा आश्वासक नाही पण सिंधू, साक्षीच्या पदकाने निदान लाज तरी राखली.