मुंबई : नांदेडमध्ये २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. गंभीर बाब म्हणजे यात नवजात बालकांचाही समावेश आहे. या घटनेवरुन आरोग्य यंत्रणेवर जोरदार टीका करण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. "मृतांच्या टाळूवरील लोणी खाणारे" ही म्हण आपण ऐकली आहे. पण लोणी खाण्यासाठी मृत्यू घडवून आणणारे राज्यकर्ते आज महाराष्ट्रात सत्ता चालवताय हे महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी दुर्दैवी अशी गोष्ट आहे, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, "मृतांच्या टाळूवरील लोणी खाणारे" ही म्हण आपण ऐकली आहे. पण लोणी खाण्यासाठी मृत्यू घडवून आणणारे राज्यकर्ते आज महाराष्ट्रात सत्ता चालवताय हे महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी दुर्दैवी अशी गोष्ट आहे. नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कालपासून आणखी ७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतकांमध्ये ४ बालकांचाही समावेश आहे. काल २४ आज ७ मृत्यू , ज्यामध्ये १६ निष्पाप बालकांचा समावेश आहे.
आधी ठाणे, आता नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर मधील घाटी रुग्णालयात मृत्यूचा थैमान... किती वेळा मंत्र्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाठीशी घालणार आहे ? आरोग्यमंत्री कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती देताय, आरोग्य खात्याचे हजारो कोटींची टेंडर निघताय. इकडे औषधांच्या तुटवड्यामुळे निष्पाप लोकांचा जीव जातोय. त्यामुळे टेंडर काढलेली कामे होत नाही आहे हे स्पष्ट आहे. मग टेंडरचा पैसा कुणाच्या खिशात चाललाय? मुख्यमंत्र्यांनी तातडीने आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री दोघांचा राजीनामा घ्यावा. जर सरकारने दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही तर हे महायुती सरकार नसून मलिदा खाण्यासाठी शासकीय रुग्णालयांना स्मशानघाटात रूपांतरित करणारे "हत्यारे सरकार" आहे, हीच ओळख या सरकारची जनतेत निर्माण होईल, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार घेणारे आणखी ४ नवजातांसह एकूण ७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मागील ४८ तासात एकूण मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या आता ३१ झाली आहे. सोमवारी मध्यरात्री १२ ते मंगळवारी मध्यरात्री १२ वाजेदरम्यान म्हणजे मागील २४ तासात आणखी 7 जणांचा मृत्यू झाला. यात ४ नवजात बालक, ३ प्रौढ यांचा समावेश आहे. त्या अगोदरच्या २४ तासात २४ जणाचा मृत्यू झाल्याने अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. आता एकूण मृत्यूंची संख्या आता ३१ वर पोहोचली आहे.