"पक्षाशी संबंध नसला तरी ज्यांचा स्वाभिमान दुखावला गेलाय त्यांनी..."; मोर्चाबद्दलच्या बैठकीनंतर अजित पवारांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 07:23 PM2022-12-15T19:23:34+5:302022-12-15T19:24:10+5:30

महापुरूषांबद्दल सतत होणाऱ्या वादग्रस्त विधानांबद्दल शनिवारी महाविकास आघाडीचा मोर्चा

Those who feel their self respect has been hurt can join in Mahavikas Aghadi protest Rally on Saturday says Ajit Pawar | "पक्षाशी संबंध नसला तरी ज्यांचा स्वाभिमान दुखावला गेलाय त्यांनी..."; मोर्चाबद्दलच्या बैठकीनंतर अजित पवारांचे विधान

"पक्षाशी संबंध नसला तरी ज्यांचा स्वाभिमान दुखावला गेलाय त्यांनी..."; मोर्चाबद्दलच्या बैठकीनंतर अजित पवारांचे विधान

googlenewsNext

Ajit Pawar on Maha Morcha: सतत महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य आणि गरळ ओकण्याचे काम थांबायला तयार नाही. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून हा मोर्चा राजकीय पक्षाशी निगडित नसल्याने या महामोर्चाला राज्यातील सर्व जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केले. आज महामोर्चाच्या आढाव्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरी येथे पार पडली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

"महापुरुषांचा सतत केला जाणारा अपमान, सीमा प्रश्न व महागाई, बेरोजगारी हे सर्व प्रश्न घेऊन सत्ताधारी लोकांचा धिक्कार करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि जनताही मोठ्याप्रमाणावर सहभागी होणार आहेत. ज्यांचा पक्षाशी संबंध नाही परंतु स्वाभिमान दुखावला गेला आहे असेही लोकं सहभागी होतील. अत्यंत समंजस भूमिका सर्व पक्षांनी घेतली आहे. अनेक राजकीय पक्ष त्यात सहभागी झाले आहेत. ज्या - ज्या वेळी बैठका घेण्यात आल्या त्या - त्या वेळी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी हजर होते. आजच्या बैठकीत मोर्चाचा आढावा घेण्यात आला. तिथे शिस्त राहिली पाहिजे. तिथे कुठेही काहीही विध्वंसक होणार नाही. अतिशय शांततेच्या मार्गाने लोकशाहीत आपले मत प्रदर्शित करताना मोर्चा काढतो त्याचपध्दतीने हा मोर्चा काढणार आहोत," असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

"आज दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विनियोजन बिलासंदर्भात बैठक झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत घेतलेल्या बैठकीबाबत काय ठरले, त्या बैठकीतून काय मार्ग निघाला याची विचारणा केली त्यावेळी त्यांनी दोन्ही राज्यांनी शांतता ठेवावी. महाराष्ट्रातून तीन मंत्री आणि कर्नाटकचे तीन मंत्री अशी सहा लोकप्रतिनिधींची समिती राहिल आणि अधिकार्‍यांची एक समिती राहणार आहे असे सांगितले. कर्नाटकची बाजू सुप्रीम कोर्टात ॲड. रोहतगी मांडणार आहेत हे समजल्यावर आम्ही ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांना महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडावी अशी मागणी करणारे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात दिले व मुख्यमंत्री यांनाही पत्र दिले आहे. आपली बाजू सुप्रीम कोर्टात चांगल्या पद्धतीने मांडणे ज्यामुळे त्या भागात राहणाऱ्या मराठी भाषिक लोकांची आग्रही मागणी आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेची मागणी आहे. बेळगाव, कारवार, निपाणी हे आपल्यात आले पाहिजे अशा पध्दतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुचवले आहे. दोन्ही राज्यांनी समंजस भूमिका घ्यावी शिवाय विरोधी पक्षांनीही घ्यावी त्यात तिन्ही पक्षाचा उल्लेख अमित शहा यांनी केला. आम्ही पहिल्यापासून राजकारण करायचं नाही अशी आमची  भूमिका राहिली आहे," याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले.

 

Web Title: Those who feel their self respect has been hurt can join in Mahavikas Aghadi protest Rally on Saturday says Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.