मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाने भेट घेतली. संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी जरांगेची भेट घेतली. या भेटीनंतर जरांगे यांनी आरोपींनी मदत करणाऱ्यांना देखील सहआरोपी करण्याची मागणी केली आहे.
भावाचा जीव गेल्यावर वेदना काय असतात, हे धनंजय यांना शब्दात व्यक्त करता येत नाहीय. जगात भाऊ दिसत नाही, न्याय द्यायला सरकार उशीर करत आहे. आरोपींनी मोठा अपराध केला आहे, आम्ही त्यांना आणि पाठबळ देणाऱ्यांना सोडणार नाही. या कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे. सरकार दिशाभूल करत आहे. आता आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा हे राज्य तुम्हाला बंद दिसेल. सरकारने बेईमानी केली तर न्याय देण्याची ताकद समाजात आहे, असा इशारा जरांगे यांनी दिला.
मी या कुटुंबाच्या पाठीशी आहे, असे मी त्यांना सांगितले आहे. सगळेच पक्षाचे नेते या प्रकरणात लढत आहेत. सगळ्या आमदारांनी लढून या परिवाराच्या पाठीशी राहावे. या प्रकरणी संपूर्ण राज्यात आंदोलन होईल. आरोपींवर खंडणीपुरते गुन्हे दाखल करू नका. त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा. सरकारने कुणाचाही मुलाहिजा ठेऊ नये. आरोपींच्या पाठीशी असणाऱ्या नेत्यालाही सोडू नका. या लोकांना साथ आणि पाठबळ देणारा मंत्रीही असला तरी त्याला सोडू नका. मदत करणाऱ्यांसह सर्व आरोपी जेलमध्ये पाहिजे, अन्यथा कुणालाही सुट्टी नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला.
तसेच जो जो खून करणाऱ्या आरोपींच्या पाठीशी उभा राहिल ते सगळे जेलमध्ये हवे आहेत. त्या महाजन नावाच्या पोलीस अधिकाऱ्यांवर का कारवाई केली नाही? असा सवालही जरांगे यांनी उपस्थित केला. तसेच सरकारवर आता ही वेळ आलीय का? आरोपी पकडायला ग्रामपंचायत का बंद ठेवाव्या लागत आहे? असाही सवाल त्यांनी केला आहे.